पत्रकारांवर हल्ला केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास

मुंबई, 7 एप्रिल 2017/AV News Bureau:

पत्रकारांना मारहाण करणे वा कार्यालयांवर हल्ला करणाऱ्यांना आता गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. पत्रकारांवर हल्ला करणे हा अजामीनपात्र  आणि दखलपात्र गुन्हा ठरणार असून दोषींना 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 50 हजार रुपयांचा दंड वा दोन्ही शिक्षा होणार आहेत. पत्रकारांना संरक्षण देणारे विधेयक आज विधानसभेत मंजूर झाले आहे.

पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांपासून संरक्षण मिळण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य संजय दत्त यांनी मांडली होती.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना नि:पक्षपणे काम करता यावे यासाठी शासन कटिबध्द आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम 2017 या कायद्याचे प्रारुप तयार करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

  • पत्रकारांच्या आरोग्यासाठी

पत्रकारांचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून 1200 आजारांवर पत्रकारांना उपचार मिळणार आहे. त्याचबरोबर, म्हाडाच्या घर वाटप योजनेत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. म्हाडामार्फत दिल्या जाणाऱ्या घरांमध्ये पत्रकारांना आरक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर, पत्रकारांना पेन्शन लागू करण्याबाबत इतर राज्यांतील पेन्शन कायद्याचा अभ्यास करण्यात येत आहे. पत्रकार संघटनांशी चर्चा करुन त्याबाबत आवश्यक तो निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.