खा.गायकवाडांवरील विमान बंदी अखेर मागे

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2017:

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा मुद्दा पुढे करीत शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावर घातलेली बंदी अखेर एअर इंडियाने मागे घेतली आहे. गायकवाड यांच्यावर बंदी घालण्याचा विमान कंपन्यांचा मुद्दा काल लोकसभेत चांगलाच गाजला. शिवसेनेने याप्रकरणी अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर हवाई वाहतूक मंत्रालयाने हस्तक्षेप केल्यामुळे एअर इंडियाने गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेत असल्याचे जाहीर केले.

23 मार्च रोजी एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना जागेच्या मुद्द्यावरून खा. रवींद्र गायकवाड आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला होता. या वादातून रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी खा. गायकवाड यांच्या विमान प्रवासाला बंदी घातली होती. मात्र शिवसेनेने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत लोकसभेत गोंधळ घातला. त्यानंतर  विमानकंपन्यांविरोधात आक्रमक होण्याचा इशारा दिला होता. तसेच 10 एप्रिलपर्यंत याप्रकरणी सरकारने ठोस तोडगा काढला नाही तर एनडीएच्या पुढच्या बैठकीवरच बहिष्कार घालण्याचा इशाराही शिवसेनेतर्फे देण्यात आला होता. याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही लक्ष घालण्याचे आश्वासन शिवसेनेच्या खासदारांना दिले होते. हवाई वाहतूक मंत्रालयानेदेखील हस्तक्षेप केला. त्यामुळे पत्रकार परिषदेत गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतल्याचे एअर इंडियातर्फे जाहीर करण्यात आले.