आत्महत्येनंतर शेतकऱ्याचे कर्ज माफ

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार

सोलापूर, ८ जून २०१७/AV News Bureau:

डोक्यावरील कर्जामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या शेतकऱ्याचे कर्ज माफ केले आहे. मुख्यमंत्र्यांनी फोनवरून कुटुंबाशी संपर्क साधून सर्वतोपरी मदत देण्याबरोबरच कर्ज माफ केल्याचे जाहीर केल्यानंतर मृत शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील वीट तालुक्यातल्या करमाळा येथील धनाजी जाधव (४५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी रात्री आत्महत्या केली होती. डोक्यावरील कर्जामुळे आपण निराश झालो असून त्यातूनच आत्महत्या करीत आहोत तसेच मुख्यमंत्री आल्याशिवाय आपला मृतदेह उचलू नये, अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या प्रकारामुळे तालुक्यात तणावाचे वातावरण पसरले होते. तेव्हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख घटनास्थळी गेले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांचे जाधव कुटुंबासोबत फोनवर बोलणे करून दिले. जाधव अल्पभूधारक असल्यामुळे त्यांचे कर्ज त्वरीत माफ करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च सरकार उचलेल आणि तातडीने १ लाख रुपयांची मदत जाधव कुटुंबाला दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जाधव कुटुंबाने धनाजी जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास होकार दिला.