युतीत सडण्याऐवजी सरकारमधून बाहेर पडा

राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांचा शिवसेनेला खोचक सल्ला

मुंबई ,27 जानेवारी 2017/AV News Bureau: 

शिवसेनेच्या पन्नास वर्षातील २५ वर्षे युतीत सडली हे कळायला इतका उशिर का लागला, असा सवाल करीत आता युतीत आणखी जास्त काळ सडण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारमधूनही बाहेर पडा, असा खोचक सल्लाही मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेला दिला.

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये आणि भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत यापुढे स्वबळावर लढण्याची घोषणा गुरूवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली. त्यांच्या पक्षाची २५ वर्षे युतीत सडली, तर मग दुर्गंधी सुटेपर्यंत युतीतून बाहेर पडायचे ते का थांबले होते आणि जर युतीतून बाहेर पडायचेच होते, तर महापालिका जागावाटपांच्या चर्चेचे नाटक तरी का केले. कुठेतरी आपल्याला हवी ती गोष्ट मिळत नाही, म्हणून आपल्याला ती गोष्टच आवडत नाही, असे म्हणण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत, शिवसेनेने आता मुंबईकरांना गृहीत धरणे सोडून द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

युती तुटली तरीही दोन्ही पक्षांचे संकुचित राजकारण मात्र पुढेही चालूच राहाणार आहे, ही बाब आगामी मतदानात मुंबईकर चांगलेच लक्षात ठेवतील, असा टोलाही त्यांनी लगावला.