2022 पर्यंत महाराष्ट्रात 1 लाख 26 हजार घरे बांधणार

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 13 हजार 458 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2017:

केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे या महत्वकांक्षी कार्यक्रमाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नव्याने मागणी सर्वेक्षण हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला असून महाराष्ट्रात 1 लाख 26 हजार घरे बांधण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सुमारे 13 हजार 458 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. याशिवाय भाडेतत्वारील घरांसाठी लवकरच राष्ट्रीय नागरी धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज दिली.

सरकारने 2008 शहरे आणि गावांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 17.73 लाख परवडणाऱ्या किंमतीतील घरे बांधणीला मंजुरी दिली आहे. या कामासाठी 96 हजार 226 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.परवडणाऱ्या दरातील गृहबांधणी प्रकल्पांकरता पुरक वातावरण तयार करण्यासाठी या विभागाला पायाभूत सुविधांचा दर्जा देणे, अशा प्रकल्पातून मिळणाऱ्या नफ्याला आयकरातून सूट देणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत असे नायडू यांनी सांगितले.

  • महाराष्ट्रात 1.26 लाख घरे बांधणार

महाराष्ट्रात 13,458 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अशी एकूण 1.26 लाख घरं बांधण्यात येणार आहेत. यासाठी 1,915 कोटी रुपयांची केंद्रीय मदत मिळणार आहे. आतापर्यंत साधारणपणे 40 हजार घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली असून 6963 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

  • लाभार्थीला 1.50 लाखांची केंद्राची मदत

परवडणाऱ्या गृहबांधणी क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी त्यांचे मंत्रालय खाजगी जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या प्रकल्पांमध्ये प्रत्येक पात्र लाभार्थीला 1.50 लाख रुपयांचे केंद्रीय सहाय्य देण्याबाबत विचार करत आहे असे नायडू यांनी सांगितले.

  • भाडेतत्वारील घरांसाठी लवकरच राष्ट्रीय नागरी धोरण

स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, एकल नोकरदार महिला आदींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भाडे तत्वावरील घरांसाठी राष्ट्रीय नागरी धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. भाडेतत्वावरील सामाजिक गृहबांधणी प्रकल्पात तसेच बाजारातील मागणीनुसार, मात्र सरकारी सहाय्याशिवाय बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पातील  गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी या धोरणात अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. सर्वांसाठी घरकुलांचे उदिृष्ट साध्य करण्यासाठी भाडे तत्वावरील घर ही संकल्पना सहाय्यक ठरेल असेही ते म्हणाले.

सर्वांसाठी घरे प्रगती अहवाल -एप्रिल 2017

housing chart