दानवे पदावर राहणे विरोधकांच्या फायद्याचे

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा उपरोधिक टोला

मुंबई,11 मे 2017/AV News Bureau:

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पदावर राहणे हे विरोधकांच्या फायद्याचे आहे.  त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला करता ? असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी  आज मारला.

रावसाहेब दानवे यांनी जालना येथे  शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे  त्यांच्यावर टीक करण्यात येत असून राजकीय पक्षांनी त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. त्यावर शरद पवार यांनी विरोधी पक्षांनी दानवे यांच्यावर कारवाईची मागणी करू नये, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. दानवेंच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांचा फायदा विरोधी पक्षांनाच होईल, असेही पवार म्हणाले.

राज्यातील विविध प्रश्नांवर शिवसेना नेते व कार्यकर्ते मराठवाड्यात दौरे करीत आहेत. भाजपही निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. पण आपण  मात्र सुखवस्तू   झालो आहोत. गेली 15 वर्ष आपण सत्तेत होतो.  आपले सरकार जाऊन अडीच वर्ष झाली पण आपली मानसिकता अजून सत्तेत असल्यासारखीच आहे, असा घरचा आहेर राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. ही मानसिकता आपल्याला बदलावी लागेल. रस्त्यावर उतरुन संघर्ष केला पाहिजे. लोकांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहे, असेही पवार म्हणाले.