कोस्टल रोडला पर्यावरणविषयक अंतिम मंजुरी

मुंबई, 11 मे 2017/AV News Bureau:

मुंबईच्या वाहतूक क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नियोजित सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) उभारणीसाठी आवश्यक असणारी पर्यावरणविषयक अंतिम मंजूरी मळाली आहे. या मंजुरीमुळे मुंबईच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कोस्टल रोडच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करुन तात्काळ त्याचे काम सुरू करता येणार आहे.

यापूर्वीदेखील विविध अधिसूचना काढून कोस्टल रोडसाठीच्या वेगवेगळ्या परवानग्या देण्यात आल्या होत्या. ही त्यातील अंतिम परवानगी आहे. या सागरी किनारा मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. गेली अनेक वर्षे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम विविध परवानग्यांअभावी रखडले होते. मात्र केंद्राकडे पाठपुरावा करून संबंधित प्रकल्पाशी निगडीत सर्व परवानग्या मिळाल्याने हा प्रकल्प उभारण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.

मुंबईच्या कोस्टल रोडसंदर्भातील सीआरझेडच्या अंतिम मंजुरीचा मसूदा पर्यावरण मंत्रालयाकडे सोपविण्यात आला होता. त्यनंतर त्याच्या मंजुरीची प्रक्रिया तातडीने करण्याबाबत राज्य सरकारने केंद्राला विनंती  केली होती. मुख्‍यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय पर्यावरण व वने राज्यमंत्री अनिल दवे यांची भेट घेऊन राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात चर्चा केली होती. यामध्ये कोस्टल रोडसाठी आवश्यक असणाऱ्या पर्यावरणविषयक अंतिम मंजुरीच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यावेळी मसुदा मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्यासंदर्भातील अंतिम अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पर्यावरण मंत्री अनिल दवे यांचे आभार मानले आहेत.