…तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांचा इशारा

मुंबई, 15 मे 2017 /AV News Bureau:

राज्यात सध्या अवकाळी पाऊस व वादळांमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत.  अशा काळात ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तरीही मुख्यालयात हजर न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिला आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष परिमंडलस्तरावर काम करणाऱ्या कनिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  कुमार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त वीजग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी.  त्यामुळे ग्राहकांना मोबाइलद्वारे महावितरणच्या विविध सेवा उपलब्ध करून देता येईल. तसेच जनमित्र व तंत्रज्ञ यांनी संबंधित गावातच राहावे, त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींची त्यांना तातडीने दखल घेता येईल व ग्राहकांशी सुसंवाद राहील. त्यातून वीजबिलाची वसुलीही चांगल्या प्रमाणात होईल, असे मत कुमार यांनी व्यक्त केले.