समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य

श्रमिक रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रामदास डोके यांचे प्रतिपादन

एनडीएच्या परिक्षेत देशात तिसऱ्या आलेल्या जुई ढगे हिचा ट्रस्टच्यावतीने जाहीर सत्कार

मुलींनी एनडीए करून देशसेवा करावी – जुई ढगे

10 वी तसेच 12 वीच्या परिक्षेत उत्तम यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 21 जून 2023

श्रमिक वर्गातील असंख्य गुणवान मुले योग्य मार्गदर्शन अथवा आर्थिक विवंचनेमुळे उच्च शिक्षणापासून वंचित रहात असतात. त्यामुळे समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना आपणच प्रोत्साहन देवून त्यांना सक्षम बनविण्यामध्ये हातभार लावावा, असे प्रतिपादन श्रमिक रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रामदास डोके यांनी व्यक्त केले.

श्रमिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दहावी- बारावी इयत्तेत उत्तम यश मिळविणाऱ्या तसेच देशातील प्रतिष्ठेच्या एनडीएच्या परिक्षेत देशात तिसऱ्या क्रमांकाने तसेच पुणे जिल्ह्यातून पास होणारी एकमेव विद्यार्थी जुई ढगे हिचा सत्कार सोहळा २० जून रोजी वाशी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यांनी आपले विचार मांडले. यावेळी एनडीए परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या जुई ढगे हिला श्रमिक रामदास चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने एक लाख रुपये देवून गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक राजू शिंदे, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश जाधव, पुंडलिक रमाजी चौधरी, सौ शारदा रामदास डोके, डॉ. ठोकणे, सत्कारमुर्ती जुई राजेंद्र ढगे, जुईचे वडील राजेंद्र नरहरी ढगे, आई मनिषा राजेंद्र ढगे, श्रीराम डोके, डी. के. माळी आणि अन्य मान्यवर विद्यार्थी, पालकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रामदास डोके पुढे म्हणाले की, समाजातील तळागाळातील लोकांना आपली स्वप्ने पूर्ण करता यावी यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असतो. त्याचाच एक भाग म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करीत असतो. आज एनडीएसारख्या परिक्षांमध्ये मराठी मुले चांगले यश मिळवत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना जुई ढगे हिने सांगितले की,  मला नवी मुंबईतील श्रमिक रामदास चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जो पुरस्कार दिला आहे. त्याचा वापर मी सामाजिक कार्यासाठी करेन. देशातील एन डी ए ही परीक्षा पास होणारी पुणे जिल्ह्यातील मी एकमेव मुलगी ठरली आहे. मुलींनी या क्षेत्रात देखील यावे. एनडीए करून मुलींनी देशसेवा करावी. १२ वी झालेल्या मुलांना सरकारमध्ये क्लास वन ऑफिसर व्हायची संधी एनडीए देते असे मत जुई ढगे हीने व्यक्त केले.

ती पुढे म्हणाली की, २०२१ साली सरकारने जाहीर केले. की मुलींसाठी  एनडीए मध्ये जागा उपलब्ध केल्या जातील. ते ऐकून आनंद वाटला. मात्र अवघ्या १९ जागा ठेवण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा अभ्यास करताना कळले की ही किती कठीण परीक्षा आहे. मात्र सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास काहीही अशक्य नाही असे जुई म्हणाली. या परीक्षेचा निकाल अवघा ०.००१ टक्का लागतो. तरीही मुली या क्षेत्रात येत आल्याचे पाहून आनंद होतो आहे, असे तिने सांगितले.

यावेळी जुईचे वडील राजेंद्र ढगे व आई मनीषा ढगे यांनी देखील विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. तसेच निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश जाधव यांनीदेखील आपण आपल्या मुलींच्या शिक्षणात कोणतीही कमकरता भासू न दिल्यामुळे त्या आज उच्च शिक्षण घेवून परदेशात नाव कमवत आहेत. त्यामुळे मुलींना देखील योग्य शिक्षण मिळाल्यास या समाजात सक्षमपणे वावरू शकतात, असे सांगितले.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र