पनवेलमध्ये मॅटवरील कब्बडी स्पर्धा

जिल्ह्यातील 16 पुरूषांचे संघ सहभागी

पनवेल, 3 एप्रिल 2017/AV News Bureau:

रायगड जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने आणि पेण तालुका रहिवाशी संघ पनवेल यांच्या विद्यमाने येथील व्ही के हायस्कुलच्या प्रांगणात जिल्हास्तरीय पुरुष गटाच्या आमंत्रित १६ संघांच्या मॅटवरील कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

कबड्डी खेळामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंवर चढाई करणाऱ्याला त्याच्या संघातील इतर खेळाडू चढाई करणाऱ्याला साथ देऊ शकत नाहीत, मात्र प्रोत्साहन देऊ शकतात. त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येकाला प्रोत्साहित करण्यासाठी सर्वानी पुढे सरसावले पाहिजे. सर्वपक्षांचे लोक राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून पेण रहिवाशी संघाच्या उपक्रमांना हजेरी लावतात हे पेणकरांच्या खिलाडू वृत्तीचे आणि मेहनतीचे द्योतक आहे. पेण तालुका रहिवाशी संघाने केवळ कबड्डीचा नाही तर सामाजिक क्षेत्रातील पनवेलच्या विकासाबाबत सातत्याने भर घातली आहे. पेणच्या अनेक खेळाडूंनी कबड्डीमध्ये राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे. अनेक वर्षांपासून कबड्डी स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करून कबड्डीपट्टूना प्रोत्साहन करण्यासाठी सातत्याने पेण तालुका रहिवाशी संघाचे सहकार्य लाभत असते असेही ते म्हणाले.