पनवेल महापालिका द्या… मी विकास देतो

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पनवेलकरांना आवाहन

पनवेल, 21 मे 2017/AV News Bureau:

केंद्र आणि राज्य सरकारने विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. मला पनवेल महापालिका द्या, मी तुम्हाला विकास देतो, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पनवेलकरांना केले.

पनवेल महापालिका निवडणुकीतील भाजप-रिपाइं उमेदवारांच्या प्रचारासाठी नवीन पनवेलच्या बांटीया हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पर्यंटन मंत्री जयकुमार रावल,  रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

पनवेलला महापालिका बनविण्याची गेल्या 25 वर्षांपासूनची मागणी होती.  महापालिकेला विरोध करणारेच आता मते मागत आहेत. न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र न्यायालयालादेखील महापालिका होणे ही काळाची गरज वाटली आणि त्यांनी विरोधकांची मागणी फेटाळली.  आम्ही जे बोलतो ते करतो. पनवेल महापालिकेची मागणी आम्ही पूर्ण केली. महापालिका होवून केवळ सहा महिनेच झाले आहेत. मात्र विकासकामांसाठी शासनाने 80 कोटी रुपये पनवेल महापालिकेला दिले आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी पनवेल महापालिकेचा अमृत योजनेत समावेश केला आहे. 2017-18 सालासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

नवी मुंबई विमानतळामुळे या भागाचा मोठा विकास होणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सांडपाण्याचे, कचऱ्याचे प्रश्न निर्णाण होतील. मात्र याच समस्यांतून पैसा मिळणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांना देता येईल, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून चांगल्या ब्रँडचे खेत तयार करून विकता येईल, यातून महापालिकेला पैसा मिळेल.  सांडपाणी प्रक्रिया आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प हाती घ्या, सरकार पूर्ण मदत करील, असे  मुख्यमंत्री म्हणाले.

  • हे श्रेय आमदार प्रशांत ठाकूर यांचे

प्रशांत ठाकूर आमदार झाले, तेव्हा खारघरचा टोल माफ करा आणि पनवेल महापालिका करण्यास परवानगी द्या बाकी काही नको, अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे आज खारघरचा माफ झालेला टोल तसेच पनवेल महापालिका हे केवळ आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळेच झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

  • अनधिकृत घरांना संरक्षण नाही, पण गरजूंना घरे

शहरात अनधिकृत बांधकामांना पेव आले आहे. राज्य सरकार कोणत्याही अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणार नाही. परंतु ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांना मदत करायची आहे. गरजेपोटी बांधलेली घरे, पुरामुळे उध्वस्त झाल्यानंतर उभी राहिलेली घरे  यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा. 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला घर देण्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्वप्न आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजूंना घरे देण्याबाबत ठोस प्रस्ताव तयार करा, त्यांना मान्यता देवू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील इतर काही मुद्दे

  • पनवेलवरून सीएसटीला येणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. त्यामुळे विद्यमान रेल्वे मार्गावर त्याचा ताण पडत आहे. मात्र आपल्या नागरिकांना चांगल्या प्रवासाची सोय मिळावी यासाठी एलिवेटेड रेल्वे मार्गाचे लवकरच काम सुरू होणार आहे.
  • नवी मुंबई शहराला मुंबईशी जोडण्यासाठी ट्रान्सहार्बर मार्ग अतिशय महत्वाचा आहे. गेली अनेक वर्षे आपण केवळ चित्रातच तो मार्ग पाहत आलो होतो . मात्र आता तो प्रत्यक्षात लवकरच अवतरणार असून त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
  • खारघर, पनवेलमधील मेट्रो 2018 पर्यंत पूर्ण करणार. मेट्रोचे एकूण 106 कि.मी. लांबीची योजना आहे. मात्र केवळ 21 कि.मी. अंतरालाच मान्यता दिली होती. परंतु आता संपूर्ण मेट्रो प्रकल्प पूर्ण करून या शहरातील प्रवास अधिक वेगवान करण्यावर भर देण्यात येणार आहे.