सुस्साट ‘तेजस’ मडगावपर्यंत धावणार नाही

  • दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी या 6 स्थानकांवरच थांबणार
  • मडगावला जाण्यासाठी दुसऱ्या गाडीवर अवलंबून रहावे लागणार
  • गाडीचे भाडेही इतर गाड्यांच्या तुलनेत 20 टक्के अधिक

नवी मुंबई, 22 मे 2017/AV News Bureau :

मोठा गाजावाजा करीत आजपासून सुरू होणारी तेजस एसी एक्सप्रेस मडगावपर्यंत जाणार नाही. केवळ तीन स्थानकांसाठी चालविण्यात तेणाऱ्या तेजसमुळे पर्यटकांच्या सोयीचे असलेल्या मडगावला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. तेजसने प्रवास करणाऱ्यांना मडगावला जायचे असल्यास  सुमार 29 कि.मी.च्या अतिरिक्त प्रवासासाठी अधिक पैसे खर्चून दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. त्यामुळे आधीच 20 टक्के अधिक  तिकिट असणाऱ्या तेजसच्या प्रवाशांना एसीतही घाम फुटणार आहे.

देशातील पहिली एसी सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून तेजसचे नाव घेतले जात आहे. ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ आठ तासांत मुंबईहून करमाळीला ही गाडी जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हणणे आहे. मात्र मुंबई, ठाणे, पनवेल स्थानकांतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा कितीसा फायदा होणार हे पहायला हवे. कारण कोकण आणि गोव्यातील केवळ रत्नागिरी, कुडाळ आणि करमाळी या तीनच स्थानकांवर तेजस एक्सप्रेसला थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यातून कोकण, गोव्याला जाणाऱ्या किती प्रवाशांना तेजस एक्सप्रेसचा फायदा होणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

  • तेजस मडगावपर्यंत का नाही ?

मुंबईहून सुसाट धावणारी तेजस एक्सप्रेस मडगावऐवजी एक स्थानक आधीच करमाळीला थांबविण्यात येणार आहे. मडगाव हे गोव्यातील महत्वाचे स्थानक आहे. गोव्याला येणारे पर्यटक मडगावमध्ये उतरतात. त्यामुळे आठ तासांच्या प्रवासानंतर पुन्हा नव्याने दुसऱ्या गाडीने प्रवास करण्याला पर्यटक किती पसंती देतील, हे महत्वाचे ठरणार आहे. मुंबईहून सुटणारी जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी 2 ते 2.30 च्या सुमारास पोहोचते. तर तेजस एक्सप्रेस दुपारी 1.30 च्या सुमारास करमाळी स्थानकात पोहोचणार आहे. त्यामुळे  तेजस मडगावला गेल्यास जनशताब्दीचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता असल्यामुळे त्या गाडीला करमाळीपर्यंतचा थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

  • तेजसचे प्रवासी भाडे 20 टक्के अधिक

एसीसह अन्य सोयी सुविधा देणाऱ्या आणि सर्वांचे आकर्षण ठरणाऱ्या तेजस एक्सप्रेसचे प्रवासी भाडेदेखील इतर गाड्यांच्या तुलनेत 20 टक्के अधिक असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी दिली. तेजसच्या तुलनेत इतर गाड्याचे सर्वसाधारण भाडे कमी असल्याचे आढळून येते. त्यामुळे प्रवासी तेजसचा पर्याय स्वीकारणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

tej 1000

कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या पसंतीच्या गाड्यांचे  प्रवासी भाडे  व तेजस एक्सप्रेसचे सर्वसाधारण भाडे पुढीलप्रमाणे-

  1. कोकण कन्या एक्सप्रेस (0111) (सीएसटी-करमाळी)
  • स्लीपर- सुमारे  380 रुपये,  3 एसी स्लीपर-1025, 2 एसी स्लीपर-1480, 1 एसी स्लीपर -2500
  1. मांडवी एक्सप्रेस- (सीएसटी-करमाळी)
  • सीटींग – सुमारे 220 रुपये,  सुमारे  380 रुपये,  3 एसी स्लीपर-1025, 2 एसी स्लीपर-1480, 1 एसी स्लीपर -2500
  1. राज्यराणी एक्सप्रेस (तुतारी एक्सप्रेस) (दादर-सावंतवाडी)
  • 2 एसी स्लीपर 1365 रुपये,  3 एसी स्लीपर 950 रुपये, स्लीपर 350 रुपये,
  1. जनशताब्दी एक्सप्रेस (12051) दादर- मडगाव)
  • एसी चेअर कार 940 रुपये, सेकंड सिटींग 270 रुपये
  1. तेजस एक्सप्रेस (सीएसटी –करमाळी)
  • एसी चेअर कार 1310 रुपये, एक्झिक्युटिव्ह चेअर साधारणपणे  2740 रुपये

(स्रोत –http://www.indianrail.gov.in)

 

 

तेजस एक्सप्रेसचे वेळापत्रक

मान्सूनपूर्व वेळापत्रक (9 जूनपर्यंत आठवड्यातील पाच दिवस)

  1. गाडी क्रमांक 22119 सीएसटी-करमाळी तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस पहाटे 5 वाजता सीएसटी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.30 मिनिटांनी करमाळी स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे दिवस –मंगळवार, बुधवार, शुक्रवार,शनिवार, रविवार
  1. गाडी क्रमांक 22120 करमाळी-सीएसटी तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस दुपारी 2.30 ला करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजता सीएसटी स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे दिवस –मंगळवार, बुधवार, शुक्रवार,शनिवार, रविवार

मान्सून वेळापत्रक (10 जूनपासून पुढे. आठवड्यातून तीन दिवस गाडी)

  1. गाडी क्रमांक 22119 सीएसटी-करमाळी तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस पहाटे 5 वाजता सीएसटी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.30 मिनिटांनी करमाळी स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे दिवस –सोमवार, बुधवार, शुक्रवार
  1. गाडी क्रमांक 22120 करमाळी-सीएसटी तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस सकाळी 7.30 ला करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 7.45 वाजता सीएसटी स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे दिवस –मंगळवार, गुरवार, रविवार
  • गाडीचे थांबे –

दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कुडाळ, करमाळी या 6 स्थानकांवरच थांबणार

  • एकूण डबे –

तेजस एक्सप्रेसला एकूण 15 डबे असणार आहेत. त्यामध्ये फर्स्ट क्लास आसन व्यवस्था असलेला 1 डबा, आसनव्यवस्था असलेले इतर 12 डबे, जनरेटर आणि एसएलआरचे  2 डबे.