शाळांची मैदाने फेरीवाल्यांना उपलब्ध करणार

आराखडा करण्याबाबत ठाणे पालिका आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

ठाणे, 22 मे 2017/AV News Bureau:

आरक्षित भूखंड तसेच शाळांची मैदानेही ठराविक वेळेसाठी फेरीवाल्यांना देण्याबाबत चाचपणी करण्यात येणार आहे. ठाणे शहरासाठी सर्वंकष तसेच फेरीवाल्यांच्या सर्वच घटकांना सामावून घेणारे फेरीवाला धोरण तयार करून 15 ऑगस्टपर्यंत सुरू करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.

सर्वंकष आणि आदर्श फेरीवाला धोरण राबवण्याबाबत सर्व अधिका-यांची बैठक बोलविली होती. त्या बैठकीत त्यांनी फेरीवाला समस्या सोडविण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

लोकसंख्येच्या प्रमाणात किती फेरीवाल्यांना परवानगी देता येणे शक्य आहे त्याचबरोबरच त्यांच्यासाठी जागा निश्चित करणे, निश्चित केलेल्या जागेच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा, पार्किंगची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, प्रत्येक प्रभाग समितीमध्ये त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभा आदी महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली. त्यासाठी शहर विकास विभागाच्या अधिका-यांना त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.

  • मोठ्या गृहसंकुलात भाजीवाले, फळवाले

मोठ्या गृहसंकुलातंर्गत भाजीवाले, फळवाले किंवा इतर फेरीवाल्यांना समाविष्ट करता येईल जेणेकरून त्या गृहसंकुलातील रहिवाशांना भाजीपाला, फळफळावळ तसेच इतर वस्तू विकता येतील का याचीही शक्यता पडताळण्यात येणार असून याबाबत संबंधित गृहसंकुलांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

  • शाळेची मैदाने फेरीवाल्यांसाठी देण्याबाबत चाचपणी

महापालिका क्षेत्रात आरक्षित भुखंड, खुली मैदाने, सुविधा भुखंड, तलावांचा परिसर, शाळांची मैदाने, ज्या ठिकाणी रस्ता संपला आहे ती जागा आदी ठिकाणे फेरीलावाल्यांसाठी ठराविक वेळेसाठी उपलब्ध करून देता येतील का विषयीही आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी शहर विकास विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर रस्ते किंवा फुटपाथ ही ठिकाणे मर्यादित वेळेसाठी फेरीवाल्यांसाठी उपलब्ध करून देता येईल का याबाबतही सर्वांना विश्वासत घेवून निर्णय घेण्याचे सुतोवाच पालिका आयुक्तांनी दिले.

  • फेरीवाल्यांना ओळखपत्र व सांकेतांक क्रमांक देणार

धोरण आणि आराखडे तयार होत असतानाच फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याची आणि त्यांचे सांकेतांक क्रमांक तयार करण्यात यावेत. हे सांकेताक क्रमांक फेरीवाल्याच्या व्यवसायानुसार असावे. फेरीवाल्याचा सांकेतिक क्रमांक आहे आणि त्याच्यासाठी कोणत्या ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली आहे हे समजेल. या ओळखपत्राचा गैरवापर झाल्यास संबंधितावर कठोर करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.

  • खाऊ गल्लींसाठी विशेष ठिकाणे

शहरात विविध ठिकाणी खाऊ गल्लीच्या धर्तीवर काही ठिकाणे निश्चित करण्याबाबत विचार सुरू असून या ठिकाणी पार्किंग व्यवस्था, विद्युत व्यवस्था आणि स्वच्छता आदींबाबत यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहेत जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. खाऊ गल्लीची ठिकाणे ही गर्दीच्या ठिकाणी, पार्क  आणि मनोरंजनांची ठिकाणी, मोठी गृहसंकुले या ठिकाणी सुरू करता येतील का याबाबत विचार सूरू असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.

t1 (2)