गिरणी कामगारांना ऑनलाइन अर्जासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई, 27 जून 2017/AV News Bureau:

गिरणी कामगारांना म्हाडाच्या (mhada) घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 31 जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली  आहे. यापूर्वी ही मुदत 27 जूनपर्यंत होती. मात्र अनेक गिरणी कामगारांना तसेच त्यांच्या वारसांना अर्ज करता आले नसल्यामुले त्यांच्यासाठी ही मुदत वाढ देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 58बंद / आजारी गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याच्या उद्देशाने मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (mhada) चा विभागीय घटक) सन 2010-11मध्ये मोहिम राबविली होती. मात्र ज्या गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांना अर्ज करता आले नाहीत केवळ अशाच गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांच्यासाठी अंतिम मोहिमेअंतर्गत नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली आहे,अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली.

‘म्हाडा’मार्फत सन 2010-11 मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण 1 लाख 48 हजार 711  गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांनी अर्ज सादर केले होते. सादर अर्जदारांची यादी म्हाडाचे संकेतस्थळ  http://mhada.maharashtra.gov.in वर 14 मार्च 2011आणि 27 एप्रिल 2012  रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत नाव समाविष्ट आहे किंवा कसे याबाबत म्हाडाचे संकेतस्थळ https://millworker.mhada.gov.in वर ‘गिरणी कामगार / वारसांचे नाव’ किंवा ‘अर्ज क्रमांक’ नमूद करून खातरजमा करून घ्यावी. यापूर्वी अर्ज सादर केला नसल्याची खात्री झाल्यानंतरच ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अर्जदारास 150 रुपये (प्रशासकीय खर्च) ऑनलाईन भरणा करणे अनिवार्य आहे. 150 रुपये भरल्याशिवाय नोंदणी करता येणार नाही. तसेच ज्या गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांना 150 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरणे करणे शक्य नाही केवळ त्यांनीच म्हाडाने नियुक्त केलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या 1) शॉप नं. 3-10, तळ मजला, सिटी व्ह्यू बिल्डिंग, डॉ. एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई. 2) वीर महाल स. गृ. नि. संस्था, तळ मजला, शॉप नं.9-12, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई. 3) हॉलमार्क प्लाझा, गुरुनानक हॉस्पिटल जवळ , कला नगर, वांद्रे (पूर्व), मुंबई या शाखेमध्ये कार्यालयीन वेळेत 31 जुलै 2017 दुपारी 3 वाजेपर्यंत व्यक्तिशः उपस्थित राहून रोख रकमेचा भरणा करून पोच पावती प्राप्त करून घ्यावी.

ठळक मुद्दे

  • ऑनलाईन अर्ज करतांना नोंदणी प्रकार (Enrollment Type) मध्ये ‘गिरणी कामगार’ किंवा ‘कायदेशीर वारस’ बरोबर नमूद केला असल्याची खातरजमा करावी.
  • मूळ गिरणी कामगार ‘गिरणी कामगार’ ऑनलाइन अर्ज करीत असल्यास नोंदणी प्रकारामध्ये‘गिरणी कामगार’ नमूद करावे.
  • मूळ गिरणी कामगार मयत असल्यामुळे जर त्यांच्या वारसांपैकी कोणताही एक वारस ऑनलाइन अर्ज सादर करीत असल्यास नोंदणी प्रकारामध्ये ‘कायदेशीर वारस’ नमूद करावे
  • मूळ गिरणी कामगार हयात असल्यास मूळ गिरणी कामगारांनीच ऑनलाइनअर्ज करावा वारसांनी अर्ज करू नये
  • मूळ गिरणी कामगार मयत असल्यासगिरणी कामगारांच्या वारसांपैकी फक्त एका वारसाने ऑनलाईन अर्ज करावा
  • फोटो अपलोड करण्यापूर्वी म्हाडाच्या संकेतस्थळावर दिलेली फोटो हेल्प फाइल बघावी व त्यानुसार फोटोची साइझ ३०० केबी पर्यंत असल्याची खातरजमा करूनच फोटो अपलोड करावा.