पनवेलमध्ये 55 टक्के मतदान

  • आता 26 तारखेकडे साऱ्यांचे लक्ष

नवी मुंबई, 24 मे 2017/AV News Bureau:

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली पनवेल महापालिकेसाठीची निवडणुक रणधुमाळी आज संपली. 78 जागांसाठी रिंगणात उतरलेल्या 418 उमेदवारांचे भवितव्य पनवेलकरांनी मतपेटीत बंद केले. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान झाल्याची माहिती पनवेल महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी ठेवलेल्या चोख पोलीस बंदोबस्तामुळे मतदानाच्या काळात कोणतीही मोठी अनुचित घटना घडलेली नाही.

आज सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीसाठी मतदान करणार असल्यामुळे मतदारांमध्येही उत्साह दिसत होता. विशेष म्हणजे महिला आणि तरुण मंडळींनीदेखील उत्साहाने मतदानात भाग घेतला. उन्हाळ्याचे दिवस असूनही उन्हाची तमा न बाळगता मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे मतदानाची टक्केवारी 55 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच पार पडलेल्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. निवडणूक प्रचारात भाजपा सुरुवातीपासूनच आघाडीवर होती. तर शेकापने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करीत मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने भाजपशी युती न करता स्वतंत्रपणे आपले उमेदवार रिंगणात उतरविल्यामुळे  तिरंगी लढत पनवेलमध्ये पहायला मिळाली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत प्रचाराचा चांगलाच धुरळा उडाला होता. शेवटी आज मतदार राजाने सर्व राजकीय पक्षांचे  आणि त्यांच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले आहे. येत्या 26 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार असून तेव्हाच पनवेल महापालिका कोणाच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट होणार आहे.

list final