शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यास सरकारला भाग पाडू

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

मुंबई,5 मार्च 2017/AV News Bureau:

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व बिनव्याजी कर्ज जाहीर करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला भाग पाडू, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कंत्राटदारांवर चार हजार कोटींची खैरात करण्यात आली असून या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश या अधिवेशनात केला जाईल, असेही मुंडे यांनी सांगितले.

विधीमंडळाच्या उद्यापासून सुरु होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी आज संयुक्तपणे घेतला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, आमदार संजय दत्त आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

  • नोटाबंदीच्या दुष्काळाने मारले

गेले तीन वर्षे नैसर्गिक दुष्काळाचा मार खाल्लेल्या शेतकऱ्यांना यावर्षी नोटाबंदीच्या दुष्काळानं मारलं. कापूस, सोयाबीन, धान, भाज्या, फळं, दूध या सगळ्या उत्पादनांचना नोटाबंदीच्या दुष्काळाचा फटका बसला. कापूस, सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांना क्विंटलला 1800 रुपयांचे नुकसान झाले. तूरीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे  नुकसान होत आहे. हे नुकसान सरकारने भरुन द्यावे, अशी मागणी मुंडे यांनी केली.

  • जलयुक्त शिवार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार

मुख्यमंत्र्यांनी मोठी गाजावाजा करुन सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असून कंत्राटदारांवर चार हजार कोटींची खैरात करण्यात आली आहे. लोकसहभातून जी कामे घनमीटर १६  रुपये दराने करण्यात आली. त्याच कामांचा शासकीय दर ३२ रुपये, तर आमदार-खासदार निधीतून करण्यात आलेल्या कामांचा दर८६ रुपये घनमीटर लावण्यात आला आहे. या भ्रष्टाचाराचा अधिवेशनात पर्दाफाश करण्यात येईल, असे मुंडे म्हणाले.

  • मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करावे

भाजप-शिवसेनेतील संबंध पाहता सरकारच्या स्थिरतेबद्दल जनतेच्या मनात संशय असून मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव आणून बहुमत सिद्ध करावे, असे आवाहनही मुंडे यांनी दिले. मुख्यमंत्री व शिवसेना नेत्यांनी निवडणूक काळात परस्परांवर केलेल्या आरोपांची ‘डू यू रिमेंबर’ अशी आठवण करुन देत सरकारला याचाही जाब विचारण्यात येणार असल्याचे  मुंडे म्हणाले.