बारावीच्या निकालाची तारीख सोमवारी सांगणार

पुणे, 27मे 2017/AV News Bureau:

बारावीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आता निकालाचे वेध लागले आहेत. मात्र बारावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीखच अद्याप जाहीर झालेली नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मात्र येत्या सोमवारी बारावीचा निकाल कधी जाहीर करणार, हे येत्या सोमवारी कळविण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालाबाबत सोशल मिडियावरून वेगवेगळ्या तारखा सांगणारे मेसेज फिरत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे निकालाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी निश्चित तारीख कळणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकारांना दिली.

बारावीची परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातुर, नागपुर आणि रत्नागिरी या नऊ विभागांमार्फत घेतली गेली. राज्यभरातून सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी 12 वीची परीक्षा दिली आहे.

मेडिकल आणि इंजिनिअरींगला जाणारे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेच्या निकालानंतर राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाच्या तारखेवरून अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच मंडळाने निकालाबाबत खुलासा केला असून  बारावीचा निकाल 30,31 मे अखेरीस लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.