उमेदवारांना जाहिरात प्रसारणासाठी प्रमाणपत्र आवश्यक

 ठाणे 1 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2017 च्‍या पाश्र्श्वभूमीवर  निवडणूक लढविणा-या उमेदवारांना जाहिरात प्रसारणासाठी ठाणे महानगरपालिकेचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्र न घेता केबल नेटवर्क, स्‍थानिक वाहिनी, फेसबुक, ट्विटर, व्‍हॉटसअ‍ॅप आदीवर जाहिरात प्रसारित केल्‍यास आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून संबधित उमेदवारांवर  कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत.

यासंदर्भात राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या आदेशानुसार महापालिका अतिरिक्त आयुक्‍त (2) अशोककुमार रणखांब यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती गठीत करण्‍यात आली आहे. या समितीमध्ये उपआयुक्त(जनसंपर्क) व संबधित प्रभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचा समावेश आहे.

निवडणूक लढविणा-या उमेदवाराला कोणत्‍याही माध्‍यमातून जाहिरात प्रसारित करावयाच्‍या आधी सदर समितीचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या संदर्भातील अर्ज तसेच या समितीने दिलेल्‍या निर्णयाचे अभिलेख हे जनसंपर्क
अधिकारी यांचे कार्यालयात ठेवण्‍यात येणार आहेत.

सदर समितीची मान्यता न घेता कोणत्याही माध्यमाव्दारे परस्पर प्रचाराचा मजकूर प्रसिध्द केल्यास संबधितांविरुध्द आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.