हिजबुलच्या कमांडरचा खातमा

काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या हिजबुलच्या प्रयत्नांना हादरा

तणावाच्या पार्श्वभूमीवर  दळणवळण सेवा बंद

नवी दिल्ली, 27 मे 2017:

जम्मू काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हिजबुल मुजाहिदीनला भारतीय लष्कराने जबरदस्त दणका दिला आहे.पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात आज सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार अहमद भट याच्यासह दोन दहशतवादी मारले गेले. सबजार भट हा  हिजबुल मुजाहिदीनचा बुऱ्हाण वाणी याचा वारसदार म्हणून ओळखला जात होता. गेल्यावर्षी वाणी मारला गेल्यानंतर सबजार संघटनेचे काम पाहत होता. त्यालाही सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केल्यामुळे हिजबुल मुजाहीदीनला जबरदस्त हादरा बसला आहे.

सबजारला मारला गेल्याचे वृत्त पसरल्यानंतर घाटीमध्ये तणावाचे वातावरण पसरले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्राल आणि आजुबाजूच्या परिसरातील मोबाइल सेवा तसेच इतर दळणवळण यंत्रणा खंडीत करण्यात आली आहे.

काल रात्रीपासून नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवादी करीत होते. त्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रतिहल्ला केला. कालपासून सुरू केलेल्या शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलासोबत उडालेल्या चकमकीमध्ये आणखी सहा दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्करी सुत्रांनी जाहीर केली आहे.