आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गोळीबार, 4 ठार

मंदसौर, 6 जून 2017:

महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उगारलेले असतानाच आज मध्य प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 4 जण ठार तर 2 जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेची गंभीर दखल घेत न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांवरील गोळीबाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय किसान मजदूर संघाने उद्या राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे.

कृषीमालाला हमी भाव मिळावा या मागणीसाठी विविध 20 मागण्यांसाठी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. आज मंदसौर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि त्यानंतर गोळीबार केला. या गोळीबारात अनेक शेतकरी गंभीर जखमी झाले. त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. झालेली घटना अत्यंत दुःखद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे.

mp cm

तणावाच्या पार्श्वभूमीवर पिंपळमंडी आणि मंदसौरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. तर निमच जिल्ह्यात तणावाची परिस्थिती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अनेक भागातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.