शिवसेनेने मुंबई-गोवा महामार्ग रोखला

रत्नागिरी, ८ जून २०१७/AV News Bureau:

राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी सरकारमधील घटक पक्ष असलेली शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही, अशा घोषणा देत शिवसेनेने हातखंबा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना ताब्यात घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जाचा आकडा निश्चित कळावा यासाठी शिवसेना जिल्ह्यात ‘कर्जमुक्तीसाठी अर्ज’ अभियान राबवत आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना कर्मजुक्त करावे या मागणीसाठी आज मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन केले.