एमआयडीसीतील 100 बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई होणार

सिडकोला सर्वेक्षणासाठी हवा आणखी एक महिना

नवी मुंबई, 14 मे 2017/AV News Bureau:

एमआयडीसी हद्दीत बेकायदेशीर ठरविलेल्या सुमारे 100 धार्मिकस्थळांवर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस बंदोबस्त मिळाल्यावर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे एमआयडीसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर सिडको हद्दीतील बेकायदेशीर ठरविलेल्या धार्मिक स्थळांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यासाठी आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सिडको प्रशासनाने स्पष्ट केल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.

नवी मुंबई शहरात बेकायदेशीर ठरविलेल्या 441 धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेण्यासाठी आज महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापालिका आयुक्त रामास्वामी एन., अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, महापालिकेचे अधिकारी, एमआयडीसी, सिडको अधिकारी तसेच नवी मुंबई पोलीस अधिकारी उपस्थित होते. या वेळी शहरातील बेकायदेशीर ठरविण्यात आलेल्या धार्मिक स्थळांचे स्थलांतरण करणे, नियमित करणे अथवा तोडण्याची कारवाई करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत एमआयडीसी, सिडको प्रशासनाने त्यांची भूमिका मांडली असून त्यादिशेने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिका प्रशासनाकडे शहरातील 483 अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी उपलब्ध आहे. त्यापैकी 31 डिसेंबर 2016 पर्यंतची 22 धार्मिक स्थळे नियमित करण्यात आली आहेत. तर 441 धार्मिक स्थळांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या बेकायदेशीर ठरवलेल्या बांधकामांना 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत निष्कासित करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र मुंडे यांनी ही धार्मिक स्थळे नियमित किंवा स्थलांतरीत करता आली नाही तर त्यांच्यावर मे अखेरपर्यंत कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.

अतिक्रमण विभागाच्या रडावर असलेली धार्मिक स्थळे

dharmik sthale category