नवी मुंबईतील उलवे परिसरातून 84 लाखांचे अमली पदार्थ जप्त,एकाला अटक

भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 14 आफ्रिकन नागरिकांविरोधात कारवाई सुरु

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7 ऑक्टोबर 2023

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या ह्दीत अमली पदार्थांच्या वाढत्या गुन्हयांना अटकाव करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी राबविलेल्या अमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत  6 ऑक्टोबर रोजी एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उलवे नोड परिसरात व्यापक कारवाई करून 84 लाख 85  हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 14 आफ्रीकी नागरीकांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

हा लेख वाचा : स्वच्छतेसाठी शिस्त हवी

नवी मुंबई शहरातून अमली पदार्थांचा समूळ नायनाट करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ मुक्त नवी मुंबई अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सह पोलीस आयुक्त संजय मोहिते, अप्पर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ 2 चे उपायुक्त पंकज डहाणे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, गुन्हे शाखेचे उपायुक्त आदींच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहरात अमली पदार्थांविरोधात व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे.

याच मोहिमेअंतर्गत एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उलवे परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांकडून अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे 6 ऑक्टोबर रोजी उलवे नोड सेक्टर 3,5,18,24,25  मधील 12 ठिकाणी एकाचवेळी धडक कारवाई केली. या कारवाईत जुलियस नामक नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 70 लाख 60 हजार रुपये किंमतीचे एमडी (मेफेड्रॉन) व 14 लाख 25 हजार रुपये किंमतीचे कोकेन असे तब्बल 84 लाख 85 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय मोबाइल फोन, डिजिटल वजन काटा आदी साहित्यही जप्त केले आहे.

ही बातमी वाचा : वर्तमानपत्र गुंडाळलेले अन्नपदार्थ का खावू नये

या कारवाईमध्ये अवैध्यरित्या भारतात वास्तव्य करणा-या आफिकन नागरीकांवर भारतीय पासपोर्ट अॅक्ट नुसार कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये 7 महिला व 7 पुरुष ( नायजेरीयन 12,  युगांडा 1,  कोर्ट दी आयव्हरी 1) आफ्रिकन नागरीकांना लिव्ह इंडीया नोटीस बजावून त्यांना भारतातून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. अंमली पदार्थ विक्री बाबत नोंदविण्यात आलेल्या गुन्हयांचा पुढील तपास सुरू आहे.

या धडक कारवाईत तुर्भे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहूल गायकवाड, वाशी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त टेळे, विशाळ मेहुल, वाघमारे यांच्यासह परिंमंडळ 1 मधील अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक निरज चौधरी, एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल माने यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.

ही बातमी वाचा : अंदमान समुद्रातील ज्वालामुखी आर्क ऑफ-निकोबारबाबत संशोधन

दरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते आदींनी या धडक कारवाईबद्दल मोहिमेत सहभागी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

========================================================

========================================================