भारताच्या जीसॅट -17 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोची एकाच महिन्यात तिसरी दमदार कामगिरी

बंगळुरू, 29 जून 2017:

संपूर्ण भारतीय बनावटीचा अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेसाठी उपयुक्त ठरणारा जीसॅट 17  हा उपग्रह आज फ्रान्समधल्या गयाना येथून अवकाशात झेपावला. हवामान तसेच दळणवळणसंबंधी अत्यंत उपयुक्त ठरणारा हा उपग्रह असून अवकाशात उपग्रह सोडण्याची इस्रोची एकाच महिन्यातील ही तिसरी कामगिरी आहे.

जीसॅट 17 चे वजन सुमारे 4 हजार 477 इतके आहे. या उपग्रहात दळणवळण आणि हवामानाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी सी बॅंड, विस्तारीत सी बॅंड  आणि एस बॅंड उपकरणे लावण्यात आली आहेत. हवामानसंबंधी अचूक माहिती देणारी यंत्रणाही या उपग्रहाला जोडण्यात आली आहे. फ्रेंच गयाना येथील एरियन 5 वीए -248 च्या मदतीने जीसॅट 17 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. जीसॅट 17 मुळे इस्रोच्या 17 दूरसंचार उपग्रहांनाही बळकटी मिळणार आहे.

दरम्यान, अवकाशात उपग्रह सोडण्याची इस्रोची एकाच महिन्यातील ही तिसरी कामगिरी आहे. यापूर्वी इस्रोने जीएसएलवी-मार्क 3 आणि पीएसएलवी सी 38 उपग्रहांचे श्रीहरिकोटा येथून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले होते. इस्रोच्या या कामगिरीमुळे अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचे स्थान आणखी बळकट झाले आहे.