वंडर्स पार्क येथे महापालिकेचे प्लास्टिक व थर्माकोल संकलन केंद्र

  • प्लास्टिक पिशव्या तसेच, सर्व प्रकारचे थर्माकोल विभाग कार्यालयातील संकलन केंद्रात जमा करण्याचे आवाहन

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 5 जून 2018:

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नेरूळ येथील वंडर्स पार्क येथे प्लास्टिक व थर्माकोल संकलन केंद्र आजापासून सुरू करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महानगरपालिका आणि लायन्स कल्ब इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलला रोजच्या वापरातून हद्दपार केले तर नवी मुंबई हे राज्यातील प्लास्टिक व थर्माकोलमुक्त होणारे पहिले महानगर ठरेल असा विश्वास आयुक्त रामास्वामी यांनी यावेळी व्यक्त केला.

महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयात स्थापन करण्यात येणा-या प्लास्टिक संकलन केंद्रात ठेवल्या जाणा-या विशेष डबे यावेळी ठेवण्यात आले होते. नागरिकांनी आपल्या घरातील प्लास्टिक पिशव्या तसेच नको असलेले प्लास्टिक, सर्व प्रकारचे थर्माकोल आपल्या नजिकच्या विभाग कार्यालयातील संकलन केंद्रात द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ 1 चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगेरे, उद्यान विभागाचे उपआयुक्त नितिन काळे, लायन्स क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन सुरिंदर शर्मा तसेच मुकेश तनेजा, नमिता मिश्रा, छाया दुसाने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सप्तर्षी कला मंच यांनी ‘गो गो प्लास्टिक’ हे पथनाट्य प्रभावी रितीने सादर करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश प्रसारित केला. विश्व बालक केंद्र, नेरूळ यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधात्मक पथनाट्यालाही उपस्थितांची दाद मिळाली. अपोलो रूग्णालयामार्फत हात धुण्यामुळे होणा-या फायद्यांविषयी याठिकाणी जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका व खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांनीही दैनंदिन जीवनात प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करू नका असा रॅलीव्दारे संदेश दिला. यावेळी महिला बचत गटांनी बनविलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.