एसटी बस स्थानकांवर CCTV ची नजर

मुंबई, 5 जुलै 2017/AV News Bureau:

एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीच सुरक्षितता नाही तर एसटी बस स्थानकांवर गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची सुरक्षाही तेवढीच महत्वाची असते. त्यामुळे प्रवाशांच्या व कर्मच्याऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक आगार व बसस्थानकावर CCTV कॅमेरे बसविले जाणार  आहेत. एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा महत्वाचा निर्णय आज घेण्यात आला.

बस स्थानकावरील वर्दळीचा गैरफायदा घेऊन पाकिटमार, किरकोळ चोऱ्या, महिलांची छेडछाड अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बस स्थानकावर CCTV कँमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय आगारातील कार्यशाळेत व परिसरात कर्मचाऱ्यांच्या विशेषत: महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कँमेरे बसविणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. एक कॅमेरा थेट आगार व्यवस्थापकांच्या (डेपो मँनेजर) कार्यालयात बसविण्यात येणार आहे. त्यामुळे आगार परिसरातील हालचाल तसेच तेथील कामकाजावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. याबाबतची जबाबदारी एसटीच्या सुरक्ष विभागावर सोपविण्यात आली आहे.

परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष  दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लवकरच CCTV कॅमेरे बसविण्यात सुरूवात होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी प्रशासनाने ठोस पावले उचलायला सुरुवात केली असून रावते यांच्या संकल्पनेतून ‘सावध रहा’ मोहिम सुरू होत आहे.