अण्णासाहेब मिसाळ यांची कोकण आयुक्तपदी नियुक्ती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, २६ ऑगस्ट २०२०

कोकण विभागीय महसूल आयुक्त म्हणून अण्णासाहेब मिसाळ (IAS) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिसाळ यांनी आज मुंबईत आपला पदभार स्वीकारला. अण्णासाहेब मिसाळ यापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते.

कोकण आयुक्तपदावरून शिवाजी दौंड निवृत्त झाल्यानंतर सिडको अध्यक्ष राहिलेल्या लोकेशचंद्र यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून मुक्त झाल्यानंतर कोकण आयुक्तपदी अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात होती. अपेक्षेप्रमाणे अखेर मिसाळ यांच्याकडे कोकण विभागीय महसूल आयुक्तपदाचा कार्यभार राज्यशासनाने सोपविला आहे.

  • २००४ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) अधिकारी झालेल्या अण्णासाहेब मिसाळ यांचा तब्बल ३२ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे. अण्णासाहेब मिसाळ यांनी यापूर्वी कोकण विभागीय महसूल उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्याशिवाय रायगड जिल्ह्याचे सीईओ, धुळ्याचे जिल्हाधिकारी, एमआयडीसीचे संचालक तसेच नवी मुंबई महापालिका आयुक्तपदासह अनेक महत्वाचे विभाग यशस्वीरित्या सांभाळले आहेत.

नवी मुंबई महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई शहराला पहिल्या तीन शहरांमध्ये आणण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यानुसार विविध उपक्रम राबवून स्वच्छ नवी मुंबई शहरासाठी आक्रमक उपाययोजना केल्या. त्याचा परिणाम म्हणून २०२० मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत संपूर्ण देशात नवी मुंबईने सातव्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

 

दरम्यान, कोकण महसूल विभागाअंतर्गत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याला विविध कररुपाने महसूल मिळवून देण्यात सर्वात मोठा वाटा उचलणाऱ्या कोकण विभागाच्या कामकाजाचा अण्णासाहेब मिसाळ यांना आधीच दांडगा अनुभव आहे. त्यामुळे कोकण विभागीय महसूल आयुक्तपदी राज्य शासनाने त्यांची नियुक्ती केली आहे.

================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा