घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली

सहा जणांचा मृत्यू तर 17 जण जखमी

मुंबई, 25 जुलै 2017 /AV News Bureau:

घाटकोपर येथीस श्रेयस सिनेमाजवळ असणारी साईदर्शन ही चार मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन अग्निशमन दलाच्या जवांंनाचा समावेश आहेत तर  मृतांमध्ये एका तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता असून  मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची  भिती व्यक्त करण्यात येत आहे.

आज सकाळी १०.४५ च्या सुमारास ही इमारत कोसळल्याची माहिती महापालिकेला मिळाली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. ही इमारत 30 वर्षे जुनी होती. इमारतीच्या काही भागाला तडे गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र ही इमारत पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केली नव्हती. इमारतीच्या तळमजल्यावर नर्सिंग होम असून त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे रूग्णालय रिकामी होते. वरच्या मजल्यावर २० कुटुंब राहात होती. बचाव कार्य सुरू असून जखमींना राजावाडी आणि शांतिनिकेतन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात वर्षा सकपाळ (वय २०), गीता रामचंदानी (वय ५८) आणि विठ्ठल शिरगिरी (वय ३५) हे तिघे जण जखमी झाले आहेत. तर, मृतांमध्ये व्ही. रेणुका ठक या तीन महिन्याच्या चिमुरडीसह रंजनबेन शहा (वय ५२) आणि एका ८० वर्षीय वृध्देचा समावेश आहे. तर, इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केले आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.