टॅक्सीत जीपीएस लावणे बंधनकारक करणार

राज्य सरकारची विधानसभेत माहिती

मुंबई, 28 जुलै, 2017/AV News Bureau:

अनेक टॅक्सी,रिक्षाचालकांकडून प्रवाशांना त्रास दिला जात असल्याची प्रकरणी समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करणार असल्याचे राज्य सरकारने आज विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतची लक्षवेधी सभागृहात उसपस्थित केली होती.

ठाणे शहरातील रिक्षाचालकांच्या अरेरावीबाबत विखे पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. मुंबई शहर व उपनगरे, ठाणे, कल्याण आदी शहरातील टॅक्सी-रिक्षाचालकांकडून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट होणे, महिला प्रवाशांशी असभ्य वर्तणूक, प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणे आदी घटना वारंवार घडतात. वाहनाला काळा-पिवळा रंग देऊन कोणतीही परवानगी न घेता टॅक्सी वाहतूक केली जाते. रस्ते वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पोलिसांकडे असल्याने परिवहन विभाग यावर गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नाही आणि त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे,असे विखे  पाटील यांनी सांगितले.

शहरात धावणाऱ्या टॅक्सीवर नजर ठेवण्यासाठी त्यामध्ये ओला-उबेरप्रमाणे जीपीएस यंत्रणा लावणे अनिवार्य करणार असल्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.

रिक्षावाहतुकीसाठी ‘मागेल त्याला परवाना’ योजना राबविणार असल्याचीही माहिती पाटील यांनी दिली.