मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत अमराठी घटकालाही प्रतिनिधित्व

आमदार नरेंद्र मेहता यांचे आश्वासन

मीरा भाईंदर: 28 जुलै 2017 / AV News Breau:

केंद्र आणि राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारद्वारे सुरू असलेला विकासात्मक कारभार मीरा भाईंदर महापालिकेतही दिसावा,अशी मीरा भाईंदरवासियांची आहे. त्याअनुषंगाने मीरा भाईंदरचे बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक स्वरुप पाहता स्थानिकांसोबतच अमराठी समाज घटकालाही या महापालिकेतील भाजपचे प्रतिनिधित्व देण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी घोषणा मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केली. तसेच स्मार्ट सिटीसह केंद्र आणि राज्याच्या विविध विकास योजना मीरा भाईंदरमध्ये आणण्यासाठी आपण कायमच प्रयत्नशील राहू अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.

महापालिका निवडणुकांच्या उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या असून उमेदवारी देताना सर्व समाज घटकांना सामावून घेण्याचे आमचे धोरण असल्याचे मेहता यांनी सांगितले. याशिवाय महिला आणि युवा वर्गालाही तिकीट वाटपात चांगले प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेला अमराठी मतदार लक्षात घेता, लोकसंख्येच्या प्रमाणात अमराठी उमेदवारांना पक्षाची उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये डॉक्टर्स, वकील अशा उच्च शिक्षितांसोबतच उद्योजक आणि युवकांचाही समावेश असल्याने भाजपच्या उमेदवारांमध्ये प्रत्येक समाज घटकाला प्राधान्य असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.