मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाठी भाजपा पुढाकार घेणार

आमदार नरेंद्र मेहता यांची मीरा भाईंदरकरांना ग्वाही

मीरा भाईंदर, 27 जुलै 2017 / AV News Breau:

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अनेक इमारतींची अवस्था बिकट असून अशा मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी भाजपा पुढाकार घेईल, अशी ग्वाही मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे.

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात अंतर्भूत असलेल्या सीआरझेड क्षेत्रातील इमारती तसेच महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या जुन्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. या शिवाय अनेक खाजगी इमारतीही धोकादायक स्थितीत असून मालक आणि भाडेकरूंच्या वादामुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळेच महापालिका क्षेत्रातील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपाच्या जाहिरनाम्यात पुनर्विकासाच्या या मुद्द्यांचा विस्तृतपणे ऊहापोह करणार आहोत, असे आमदार मेहता यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या पुनर्विकासाबाबतच्या विविध नियमांचा आधार घेत हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा करत असल्याचेही मेहता यांनी सांगितले.

सीआरझेड कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी किनारपट्टी क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती सीआरझेड कायद्यातून वगळाव्यात, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने केंद्राकडे प्रयत्न करत आहोत. याशिवाय पुनर्विकासासाठी असलेली तीस वर्षांची मर्यादा कमी करून २५ वर्षे जुन्या इमारतींनाही पुनर्विकासाची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे, त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे मा. मेहता म्हणाले. तसेच महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींना अडीच इतका अतिरिक्त एफएसआय मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी जसा चारचा एफएसआय देण्यात आला, तशाच पद्धतीची एखादी योजना मीरा भाईंदरसाठी तयार करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. एकूणच पुनर्विकास धोरणात आमुलाग्र बदल करण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

प्रत्येक नागरिकाचे स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. मीरा भाईंदर महापालिकेत भाजपा सत्तेत आल्यास पंतप्रधानांच्या या भुमिकेला मूर्त रुप देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे नरेंद्र मेहता यांनी सांगितले.