नवी मुंबईत ‘विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा’ मोहिम

बालमृत्यूदर कमी करण्यासाठी महापालिकेचे पाऊल

नवी मुंबई, 31जुलै 2017/AV News bureau :

पावसाळ्यात अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्याच्या उद्दिष्टाने नवी मुंबई महापालिकेतर्फे 1 ऑगस्ट  ते 13 ऑगस्ट  या कालावधीत ‘विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा’ मोहिम राबविण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भाग, दगडखाणी, बांधकाम ठिकाणे, विटभट्टया, गावगावठाण अशा 2 लाख अतिजोखमीच्या लोकसंख्येत हा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यासाठी या भागात घरोघरी भेट देऊन 5 वर्षापर्यंतच्या लहान मुलांना अतिसार/जुलाब आहे का हे तपासले जाणार आहे. असल्यास, ORS व झिंक गोळयांचे/औषधांचे वाटप केले जाणार आहे.

देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 1% बालके अतिसारामुळे दगावतात आणि बालमृत्यूचे हे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य महापालिकेचे उद्दिष्ट राहणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत जनजागृती, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळया यांचा वापर, रुग्ण असल्यास ओआरएस व झिंक या गोळयांचे घरोघरी वाटप, आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस व झिंक कोपरा स्थापन करणे, अतिसार झालेल्या कुपोषित बालकांवर उपचार, शाळांमध्ये हात धुण्याचे सहा टप्प्यांचे प्रात्यक्षिक दाखविली जाणार आहेत.