सक्षम नेतृत्वाकडे मतदारांचा कल

मीरा भाईंदरमध्ये भाजपाला बहुमत मिळेल

प्रदेश प्रवक्त्या शायना एनसी

मीरा भाईंदर, 31 जुलै 2017/ AV News Bureau:

भाषावाद, प्रांतवाद किंवा धर्मनिरपेक्षता यांच्या ऐवजी देशातला मतदार आता सक्षम नेतृत्वाला पसंती देत आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांत आघाडी किंव प्रादेशिक पक्षांऐवजी स्थिर नेतृत्व असलेल्या भाजपालाच देशातला मतदार पसंती देत आहे. नेमका असाच विचार मीरा भाईंदरवासियसुद्धा करत असून त्यांची पहिली पसंतीदेखील भाजपच असेल असा विश्वास भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या तसेच कोषाध्यक्ष शायना एनसी यांनी व्यक्त केला. मीरा भाईंदर शहर भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप किमान ७५ जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये केंद्रात संपुर्ण बहुमताने जे सरकार आले, त्याचे फायदे आता मतदारांना जाणवू लागल्याने मतदारांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. ‘सबका साथ,सबका विकास’ हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाचा नारा असून भाजपच्या नेतृत्वाखालील सर्व राज्य सरकारे, पदाधिकारी आणि सर्वसामान्य कार्यकर्ते याच एकमेव अजेंड्यावर कामे करत आहेत. महाराष्ट्राला फडणवीस यांच्या रुपाने पहिल्यांदाच एक प्रामाणिक, अभ्यासू , आणि विकासाचा ध्यास असलेला मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्यात वेगवान विकास झाला असून विकास आणि पारदर्शक कारभार ही त्यांच्या कामाची द्विसुत्री आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांची वाटचाल सुरू आहे. या शिवाय केंद्रातही नितीन गडकरींसारखे मंत्री राज्याचे नाव उज्वल होईल, असे काम करत आहेत. या सर्वांच्या कामाची पोचपावती मीरा भाईंदरवासिय या निवडणुकीत देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना भाजप युतीबाबत विचारले असता नरेंद्र मेहता म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात शिवसेना हा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी असतानाही मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ते स्वबळ आजमावत आहेत. कुणी कितीही विकासाचे दावे केले तरीही शहरातील मतदारांना चांगलेच ठाऊक आहे की, कुणी किती विकास केला. गेल्या तीन वर्षांतील भाजपच्या कामाचा धडाका आणि महापालिकेतील सत्ता राबविताना केलेली विकासकामे यांच्या बळावर आम्ही जनतेकडे मते मागणार आहोत. मतदार आम्हाला एकहाती सत्ता सोपवतील, याबद्दल आपल्याला विश्वास असल्याचे ते म्हणाले. तसेच भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

अल्पसंख्यकांनाही विकास प्रक्रियेत सामावून घेणार

उत्तर प्रदेशातील भाजपच्या अभूतपूर्व विजयात अल्पसंख्यकांचा मोठा वाटा आहे. हीच बाब अल्पसंख्यकांचा भाजपवर असलेला विश्वास दाखवून देण्यास पुरेशी आहे. उत्तर प्रदेशात दिसलेला हाच विश्वास मीरा भाईंदरमध्येही दिसेल असेही शायना एनसी यांनी सांगितले.

भाजप देणार स्वच्छ चारित्र्याचे सक्षम उमेदवार

स्वच्छ चारित्र्याचे सक्षम उमेदवार देण्याला भाजपचे प्राधान्य असून उमेदवार निवडीवर खुद्द मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे.उमेदवारी देण्यापूर्वी त्याचे काम, जनसंपर्क, सामाजिक काम आणि पूर्वतिहास तपासला जात आहे. या शिवाय प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा आणि पारदर्शक कारभार हे इतर निकषही उमेदवारी देताना तपासले जात असल्याची माहिती शायना एनसी यांनी दिली.