विधानभवन परिसरात रंगला फूटबॉल सामना

मुंबई, 10 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

विधान परिषद सभापती 11 विरुध्द विधान सभा अध्यक्ष 11 अशी आमदार चषक फूटबॉल स्पर्धा आज विधानभवन प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. या चुरशीच्या लढतीत अध्यक्ष 11 संघ जिंकला. विधानभवनाच्या आवारात रंगलेल्या फूटबॉल स्पर्धेमुळे खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे या फूटबॉल स्पर्धेचे रंगतदार समालोचन (कॉमेंटरी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली.

जागतिक फूटबॉल महासंघाची (फिफा) 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिली फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे. फूटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर मिशन 11 मिलियन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मिशन 1 मिलियन हा फूटबॉल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मिशनच्या निमित्ताने शाळांमधून जवळपास 10 लाखांहून अधिक मुला-मुलींपर्यंत फूटबॉल आणि क्रीडा संस्कृती पोहोचविण्यात येणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरत असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.

आगामी काळात प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात आमदार निधीतून फूटबॉल स्पर्धा आयोजित करणार आहे.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनादरम्यान याच टीममध्ये क्रिकेट मॅच आणि महिला आमदारांसाठीही स्वतंत्र क्रिकेट मॅच होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

या स्पर्धेला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरउपसभापती माणिकराव ठाकरेविधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्रीराज्यमंत्री उपस्थित होते.