राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलणार

  • आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत 

नागपूर, 21 डिसेंबर 2017/avirat vaatchal news:

राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलण्याची आवश्यकता असून त्यामध्ये न्युरोलॉजिस्ट, फिजिशियन, न्युरो सर्जन, रेडिओलॉजिस्ट यांची नेमणूक करुन ते परिपूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल,असे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्यासह जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न विचारला होता.

सिंधुदुर्गसह राज्यातील डोंगरी भागात डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. डॉक्टरांची वेतनवाढ करण्याची आवश्यकता असून सध्या राज्यात जे विशेषज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना 70 हजार रुपये किमान वेतन आणि प्रती शस्त्रक्रिया चार हजार रुपये अशा पद्धतीने दीड लाख रुपयांचे पॅकेज देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही सावंत यांनी सांगितले.

  • गैरहजर डॉक्टरांवर कारवाई

जे डॉक्टर सातत्याने गैरहजर (ॲब्सकोंडेड) आहेत त्यांना बडतर्फे करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा सातत्याने गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर देखील बडतर्फाची कार्यवाही केली जाणार आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्‍टोबर दरम्यान झालेल्या पावसामुळे लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे.  या भागात  लेप्टोचे 87 रुग्ण आढळून आले असून डेंग्युचे 55 तर माकड तापाचे 204 रुग्ण आढळले आहेत. लेप्टोसाठी डॉक्सीसाक्लॉन गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून, माकड तापासाठी तीन टप्प्यात लस देण्यात येत आहे. आतापर्यंत 50,957 जणांना लस देण्यात आली असून, 32,000 जणांनी दुसऱ्या टप्प्यातील लस घेतली आहे. या लसीचे 70 लाख डोस प्राप्त झाले असल्याचे सावंत सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस, सावंतवाडी आणि कणकवली या तीन ठिकाणी ट्रॉमा केअर सुरु आहेत. तळेरे येथे ट्रॉमा केअर प्रस्तावित असून जागे अभावी ते अद्याप सुरु नसल्याचे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.