आयुक्तांच्या दौऱ्याआधी दिवागावातील अनधिकृत बांधकामावर कारवाई

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 9 ऑक्टोबर 2018:

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या विभाग दौऱ्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडवली आहे. महापालिका आयुक्त  उद्या ऐरोली विभागाचा दौरा करणार आहेत. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात दिवागाव येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या प्रश्नांना सर्वात आधी प्राधान्य दिले असून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

ऐरोली विभागांतर्गत दिवागाव, सेक्टर 9 मध्ये घर क्र. 362 येथे सहदेव मढवी यांच्यामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतेही पूर्व परवानगी न घेता तीन मजल्याच्या  इमारतीचे बांधकाम सुरू होते. या बांधकामाला ऐरोली विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये रितसर नोटीस बजावण्यात आलेली होती. मढवी यांनी अनाधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी अनाधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते. अतिरिक्त आयुक्त शहर रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अमरीश पटनिगीरे, ऐरोली विभाग कार्यालयातील सहा.आयुक्त अनंत जाधव आणि कर्मचारी वर्गाने या अनाधिकृत बांधकामविरोधी मोहिम राबविल्याची माहिती नवी मुंबई  महापालिका प्रशासनाने दिली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शहरातील नागरी समस्या सोडविण्याबरोबरच अनधिकृत बांधकामे,अनधिकृत पार्किंग आणि विकास कामे आदी प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

======================================================================================================================================

इतर बातम्यांचा आढावा

  • एक धाव स्वच्छतेसाठी…