सिगरेट विकताय…..मग थोटकंही उचला

  • नवी मुंबई महापालिकेची  कारवाई

नवी मुंबई,23 फेब्रुवारी 2018/अविरत वाटचाल न्यूज:

नवी मुंबई महापालिकेने आयुक्त एन. रामास्वामी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहिम आक्रमकपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घाण करणाऱ्या तसेच त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवरही आता महापालिकेच्या कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. कारण गुरुवारी सकाळी वाशी सेक्टर 16 मध्ये सिगरेट विकणाऱ्या दुकानदारालाच महापालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांनी  दुकानाच्या आजुबाजूला पडलेली सिगरेटची थोटकें उचलण्यास सांगितले. विशेष म्हणजे या दुकानाच्या परिसरात धुम्रपान करणाऱ्या वाशी येथील प्रतिष्ठीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांविरोधात त्यांच्या प्राचार्यांकडेही महापालिका प्रशासनाने याबाबत तक्रार केली आहे.

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये सहभाग घेतल्यानंतर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपायोजना सुरू केल्या आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवर तसेच परिसरातील साफसफाई दिवसातून दोनदा केली जाते. नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी आपापल्या परिसरात स्वच्छता बाळगावी तसेच कचरा करू नये याबाबत जनजागृती करण्यासाठी  महापालिका आयुक्त एन. रामास्वामी आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी सतत फिरतीवर असतात. त्याचा परिणाम म्हणून शहरात स्वच्छतेबाबत लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे काही दुकानदार तसेच नागरिक स्वच्छतेच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत असल्याबाबत पालिका अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

गुरुवारी सकाळी नवी मुंबई महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजेंद्र सोनवणे वाशी सेक्टर 16 येथे पाहणी करीत असताना एका दुकानासमोरील मोकळ्या जागेमध्ये सिगारेटची थोटके इतस्ततः पडलेली आढळून आली. सोनवणे आणि त्यांच्या पथकाने त्वरीत त्या दुकानदाराला सिगरेटची थोटके साफ करण्यास सांगितली.  सिगरेटच्या दुकानावर सिगरेट पिण्यासाठी जवळच्याच महाविद्यालयातील विद्यार्थी येत असल्याचे सोनवणे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे याबाबत थेट महाविद्लयाच्या प्राचार्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घाण करणाऱ्या तसेच त्यास जबाबदार  ठरणाऱ्या  इतर घटकांवरही कारवाई करण्यास सुरुवात केल्यामुळे दुकानदारांमध्येही खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आपले शहर स्वच्छ रहावे यासाठी महापालिका आयुक्त एन. रामास्वामी हे स्वतः लक्ष देत असतात. अशावेळी नवी मुंबईकरांनीदेखील आपल्या अवतीभवती अशाप्रकारे कचरा करणारे घटक आढळून आल्यास त्वरीत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहनही सोनवणे यांनी केले आहे.