महाविद्यालयातच मिळणार शिकावू वाहन परवाना

संगणक, टॅब बेस प्रणालीद्वारे चाचणी घेण्यासाठी अर्ज करण्याचे महाविद्यालयांना आवाहन

मुंबई, 18 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

विद्यार्थ्यांना शिकावू वाहन परवाना मिळणे सोईस्कर व्हावे, यासाठी महाविद्यालयातच संगणक व टॅब बेस प्रणालीद्वारे हे दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा आपल्या महाविद्यालयात राबविण्यासाठी मुंबई मध्य या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रातील महाविद्यालयांनी कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन ताडदेव प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या क्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन चाचणी घेऊन शिकाऊ वाहन परवाना वाटप करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयांमध्ये कम्युटर लॅब असावी, त्यात किमान 10 संगणक व 2 एमबीपीएस क्षमतेची इंटरनेट जोडणी तसेच प्रिंटरसह इतर सुविधा असावी, संगणक सुविधा उपलब्ध नसल्यास टॅबची सुविधा असणाऱ्या महाविद्यालयांना संधी देण्यात येणार आहे. याशिवाय महाविद्यालय किंवा शिक्षण संस्था मान्यताप्राप्त असावी, केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीच चाचणी घेण्यात येईल, महाविद्यालयाने चाचणीची व्यवस्था नि:शुल्क करावी, विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांनी तयार करावी, महाविद्यालयाने अर्जदारांचे अर्ज व कागदपत्र http://parivahan.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावे, कागदपत्र, अर्जांची छाननी महाविद्यालयांनी करावी, असे ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.