प्लास्टीक, थर्माकोल वस्तूंच्या उत्पादनांवर बंदी

  • पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, 16 मार्च 2018/अविरत वाटचाल न्यूज :

राज्यात प्लास्टीक तसेच थर्माकोल पासून बनविण्यात येणाऱ्या उत्पादनांवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. तसेच बंदीच्या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जास्तीत जास्त 25 हजार आणि तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.

या वस्तूंवर बंदी

  • मंत्रिमंडळाने या प्रस्तावास मान्यता दिली आहे. प्लास्टीक पासून बनविण्यात येणाऱ्या पिशव्या तसेच पॅलिस्टायरिन (थर्माकोल) व प्लास्टीक पासून बनविण्यात येणाऱ्या डिस्पोजबल वस्तू ताट, कप, प्लेटस्, ग्लास,काटेचमचे, वाटी, स्ट्रॉ, कटलरी, नॉन ओव्हनपॉलीप्रॉपीलेन बॅग, स्प्रेड शीटस्, प्लास्टीक पाऊच, सर्व प्रकारचे प्लास्टीक वेष्टन, यांचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करण्यास राज्यात बंदी असणार आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले.

बंदीमधून या गोष्टी वगळल्या

  • या बंदीमधून खालील बाबी वगळण्यात आल्या आहेत. औषधांच्या वेष्टनासाठी वापरले जाणारे प्लास्टीक, वन व फलोत्पादनासाठी, कृषी, घनकचरा हाताळणे आदी कारणांसाठी लागणाऱ्या तसेच रोपवाटिकांमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टीक पिशवी, प्लास्टीक शिटस् या बंदीतून वगळण्यात आले आहेत. मात्र या कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या या साहित्यावर ठळकपणे तसे नमूद करावे लागणार आहे, असे कदम यांनी सांगितले.

विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यातीसाठी विविक्षीत उद्योग यामध्ये फक्त निर्यातीसाठी प्लास्टीक व प्लास्टीक पिशवीची उत्पादने बंदीतून वगळण्यात आली आहेत. त्याचबरोबर उत्पादनाच्या ठिकाणी उत्पादन प्रक्रिये दरम्यान अनिवार्य वेष्टनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टीक आवरण अथवा पिशवी तसेच दूधाच्या पॅकेजींगसाठी अन्न साठवणूकीचा दर्जा असलेल्या 50 मायक्रॉनपेक्षा जाड प्लास्टीक पिशव्याही बंदीमधून वगळल्या आहेत. तथापि, पुनर्खरेदी पद्धती विकसित करण्यासाठी अशा पिशव्यांवर पुनर्चक्रणासाठी पूर्वनिर्धारीत किंमत जी 50 पैशांपेक्षा कमी नसेल ती ठळकपणे छापलेली असावी. पुनर्चक्रणासाठी अशा पिशव्यांची संकलन व्यवस्था विकसित करण्यासाठी दूध डेअरी, वितरक, विक्रेते यांनी अशा पुनर्चक्रणासाठी निर्धारीत छापील पुनर्खरेदी किंमतीनुसार अशा पिशव्यांची पुनर्खरेदी करणे बंधनकारक असणार आहे.

—————————————————————————————————————————————————

नवी मुंबई विमानतळासाठी उलवे टेकडीचे सपाटीकरण