छायाचित्रकार मोहन बने  यांना देवर्षी नारद पुरस्कार

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 7 मे 2018:

गेली ४ दशकाहून अधिक काळ पत्रकारितेसाठी खेळासह विविध क्षेत्रात कार्यरत असलेले छायाचित्रकार मोहन बने यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मोहन बने यांची बीजिंग ऑलिम्पिक, पुण्यामधील आशियाई क्रीडा स्पर्धा, मुंबई-पुणे सायकल शर्यत, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील चेतन शर्माची हॅटट्रीक तसेच आणीबाणी कालीन, भिवंडी दंगल, गिरणी कामगार लढा, दादरमधील जॉर्ज फर्नांडीस आंदोलन आदी संदर्भांमधील छायाचित्रांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळविला.

 

विश्व संवाद केंद्र-मुंबईतर्फे देवर्षी नारद जयंतीचे औचित्य साधून देशातील मान्यवर ६ पत्रकारांना पुरस्काराने माटुंगा-पूर्व येथील वेलिंगकर महाविध्यालय सभागृहात गौरविण्यात आले. यावेळी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर, डॉ. साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार मोहन बने यांच्यासह तरुण भारत असोसिएट्सचे कार्यकारी संचालक रवींद्र दाणी यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार, दैनिक लोकमतचे मुंबई शहर संपादक डॉ.राहुल रनाळकर यांना पत्रकारितेतील विशेष कामगिरी पुरस्कार, दैनिक नवभारत टाइम्सचे मुख्य वार्ताहर विमल मिश्र यांना राष्ट्रीय भाषेतील पत्रकारिता पुरस्कार, पुणे आकाशवाणीचे वृत्तसेवा उपसंचालक नितीन केळकर यांना इलेक्ट्रोनिक व ब्रॉडकास्टिंग मिडिया पुरस्कार तर ब्लॉग लेखिका स्वाती तोरसेकर यांना सोशल मिडिया व ब्लॉगिंग पुरस्कार आदी पत्रकार पुरस्काराचे मानकरी होते. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व धनराशी असे पुरस्काराचे स्वरूप होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुरस्कारार्थीचे अभिनंदन करताना सांगितले कि या पुरस्कारासाठी अर्ज न मागता त्यांच्या गुणमुल्यावरून निवड समितीने जाहीर केलेले पुरस्कार कौतुकास्पद आहेत. यामधील ज्येष्ठ पत्रकार रवींद्र दाणी, छायाचित्रकार मोहन बने यांची पत्रकारितेमधील अनेक वर्षांची निष्ठापूर्वक सेवा जवळून पाहिली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.