महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा वार्षिक मेळावा संपन्न

अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई प्रतिनिधी :
कामगारांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या लढाऊ महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्यावतीने नवी मुंबई महापालिकेच्या विविध विभागातील आस्थापनेवरील, ठोकमानधन, कंत्राट पद्धतीतील कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी युनियनमध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा युनियनच्या वतीने नुकताच नेरुळ सेक्टर 2 येथे वार्षिक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पालिकेच्या सेवेमध्ये काम करताना येणाऱ्या विविध अडचणी या मेळाव्यात कर्मचार्यानी मांडल्या. या मेळाव्याला महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तथा इंटकचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रवींद्र सावंत, युनियनचे सचिव मंगेश गायकवाड, एयर इंडियाचे निवृत्त जनरल मॅनेजर तथा कामगार कायदे तज्ञ प्रवीण गांगुर्डे आदी मान्यवर पालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेले शेकडो अधिकारी आणि  कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
  • महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, असुविधा याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला यांचा प्रामुख्याने आरोग्य विभागातील एनयुएचएम पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱयांनी तुटपुंजे मानधन, ओळखपत्र न मिळाल्याने येणाऱ्या अडचणी, कामाच्या वेळेची अनिच्छितता यामुळे येणाऱ्या अडचणी, प्रत्येक एएनएम मागे पाच ते सहा हजार लोकसंख्या असावी, रजिस्टर मधील नोंदी ऑनलाईन अँडाएट करण्यासाठी डेटा एण्ट्री ऑपरेटरच्या नेमणुका कराव्यात, लसीकरणाच्या वेळा बदलाव्यात, आरसीएच पोर्टलचे पैसे मिळावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच युनियनच्या माध्यमातून पालिका आयुक्तांची भेट घेतली जाणार असून कामगारांना अडचणी असलेल्या सर्व समस्या सोडविणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष सावंत यांनी सांगितले. या मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.