ठाण्यात ’थुंकू नका,थुंकू देऊ नका’ विशेष मोहिम

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे, ३ मे २०१९:

 ठाणे महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन विभाग, गुन्हे शाखा व ठाणे शहरातील काही डॉक्टरांच्या पुढाकाराने सार्वजनिक ठिकाणी ’थुंकू नका आणि थुंकू देऊ नका’ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ठाणे शहरात प्रथमच राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेचा शुभारंभ 4 मे रोजी सकाळी 11वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे होणार आहे.

  • ठाणे शहरात राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 1200 रिक्षाचालकांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. या रिक्षाचालकांना न थुंकण्याबाबत जनजागृती करणाऱ्या पोस्टर्सचे वाटप केले जाणार आहे. प्रबोधनात्मक पोस्टर रिक्षामध्ये लावून चालकांसह प्रवाशांना देखील याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
  • थुंकण्यामुळे पसरणारे जंतू आणि त्याचा आरोग्यावर होणारा विपरित परिणाम टाळण्यासाठी ही मोहिम शहरात राबविण्यात येणार असून यासाठी विविध प्रकारचे प्रबोधनात्मक साहित्य तयार करण्यात आले असून त्याचे वाटप केले जाणार आहे.
  • शहरात उघडयावर थुंकल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवत असतात त्यासाठी थुंकण्याची ही सवय बदलली जाण्यासाठी ही चळवळ राबविण्यात येत आहे. पोस्टर, कार्यक्रम वेगवेगळया माध्यमातून प्रबोधन करण्यांवर भर दिला जाणार असून ही चळवळ लोकचळवळ व्हावी हा उद्देश ठाणे महानगरपालिकेचा आहे.
ठाण्यातील नामांकित डॉक्टर्स मनिष सचदेव, डॉ. माला सचदेव, क्षयरोगतज्ञ डॉ. अल्पा दलाल, डॉ. महेश बेडेकर यांच्या संकल्पनेतून ही मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांनी मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

=========================================

इतर बातम्यांचाही मागोवा