नवी मुंबईत ३० सप्टेंबरपर्यंत पाणी कपात

  • दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद
  • मोरबेचा पाणी साठा कमी झाल्याची महापालिकेची माहिती
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, १ जुलै २०१९:

गेल्या वर्षीच्या तुलनेत मोरबे धरणाच्या पाणी साठा आणखी कमी झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तसेच पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने ३० सप्टेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक मंगळवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. 

  • नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे मोरबे धरण असून या धरणातून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र तसेच कामोठे, खारघर आणि जलवाहिनी लगत असणा-या 7 गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो.  सर्व साधारणपणे दररोज 40 एम.एल.डी. पाणी पुरवठा खारघर व कामोठे या सिडको क्षेत्रास देण्यात येतो व 5 एम.एल.डी. पाणी पुरवठा जलवाहिनी लगत असणा-या गावांना करण्यात येतो व उर्वरित पाणी पुरवठा हा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी करण्यात येतो.
  • नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या साधारणत: 14 लक्ष 35 हजार एवढी आहे.  सदर लोकसंख्येसाठी मोरबे धरणातून व एम.आय.डी.सी. कडून होणारा पाणी पुरवठा हा 430 एम.एल.डी  इतका होत आहे.
मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गतवर्षी व या वर्षी आजमितीस खालील प्रमाणे पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
वर्ष दिनांक पाणी पातळी मीटर पर्जन्यमान मि.मी. एकूण पाणी साठा द.ल.घ.मी.
 2018 29/06/2018 77.48 मी. 834.80 102.577 द.ल.घ.मी.
2019 29/06/2019 71.80 मी. 447.40 62.909 द.ल.घ.मी.

 

गतवर्षीच्या व आजच्या पाणी साठयामधील फरक बघता 39.668 द.ल.घ.मी. एवढा जलसाठा या वर्षी कमी आहे. त्यामुळे आत्ताच पाणी पुरवठयाचे नियोजन करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेता 1 जुलै 2019 पासून मोरबे धरणाच्या पाणी पुरवठयामध्ये 10% कपात करण्याचे प्रस्तावित असून त्याकरिता दर मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 10.00  पर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ही पाणी कपात केल्यामुळे जे पाणी उपलब्ध होईल त्यामुळे  मोरबे धरणाच्या पाणी साठयात 8 दिवस पुरेल इतका पाणी साठा होईल.
  • या वर्षी जुलै महिन्यात आवश्यक तेवढा पाऊस पडला तरीसुद्धा 30 सप्टेंबर 2019 पर्यंत पाणी कपात चालूच राहील. परंतु मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यास पाणी कपातीमध्ये वाढ होण्याची शक्यता असून भविष्यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ही पाणी कपात करण्यात येत आहे. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा