कळंबोली बॉम्बप्रकरणी तिघांना अटक

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवी मुंबई,४ जुलै २०१९:

कळंबोली येथील सुधागड शाळेच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळील भिंतीलगत हातगाडीवर स्फोटके आढळून आली होती. याप्रकरणी सखोल तपास करून तीन आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी ३ जुलै रोजी अटक केली आहे. बॉम्बच्या धमकीने पैसे उकळण्याचा उद्देश आरोपींचा होता, असे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

१७ जून रोजी कळंबोलीच्या शाळेजवळ संशयास्पद वस्तू आढळून आली होती. याप्रकरणी तपास केल्यावर एक अलार्म घड्याळ, गोल प्लॅस्टिकचा डब्बा, ५ लिटर पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये ४ लिटर पेट्रोल, एक एक्साइड कंपनीची बॅटरी, लाल रंगाची ताडपत्री, थर्माकॉलचा पांढऱ्या रंगाचा बॉक्स, १२ छीद्र असलेली आणि ११ नटबोल्ट, वॉशर, वायसरह लोखंडी प्लेट आदी वस्तू आढळून आल्या होत्या. बॉम्ब असल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणाचे गांभिर्य पाहून गेली १७ दिवस वेगवेगळ्या सहा पथकांच्या माध्यमातून सर्वत्र तपास करण्यात आला. तसेच पुणे आणि नवी मुंबई, रायगड परिसरात सापळा रचून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुशिल प्रभाकर साठे (३५) राहणार पुणे, मनिष लक्ष्मण भगत (४५) राहणार उलवे आणि दिपक नारायण दांडेकर (५५) राहणार उलवे यांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी केली असता शाळेच्या बाजूला राहणा-या एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावण्यासाठी कमी क्षमतेचा स्फोट घडवून आणायचा होता.  त्याच्याकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिली. मात्र बॉम्बची जोडणी व्यवस्थित न केल्यामुळे स्फोट झाला नाही.  बॉम्ब बनविण्यासाठी अमोनियम नायट्रेट आणि जिलेटीनचा वापर केल्याचेही समोर आल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • या गुन्ह्याचा तपास विशेष पथकातील सहा. पोलीस आयुक्त अजय कदम, प्रदिप कन्नलु, रविंद्र गिड्डे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे, कोडीराम पोपरे, निवृत्ती कोल्हटकर, संदिपान शिंदे, शिरीष पवार, विदय कादबाने, सहा. पोलीस निरीक्षक राहुल राक, रुपेश नाईक, राजेश गज्जल , सुधीर निकम, विजय चव्हाण, संदिप गायकवाड, पो. उप.निरीक्षक भुषण कापडणीस, योगेश वाघमारे, राणी काळे, योगेश देशमुख, नितीन शिंदे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केला.

=================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा