५० हजाराच्या लाचप्रकरणी सिडकोचा अधिकारी ताब्यात

  • एका खासगी एजंटलाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, २ डिसेंबर २०१९

घर नावावर करण्यासाठी एका व्यक्तीकडून ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सिडकोच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज नवी पनवेल येथे सापळा रचून रंगेहाथ पकडले. सागर मदनलालजी तापडिया  असे सिडकोच्या सहाय्यक वसाहत अधिकाऱ्याचे नाव आहे. तापडिया यांच्यासोबत रविंद्र छाजेड या खासगी एजंटलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

एका व्यक्तीने घर नावावर करण्यासाठी पनवेल येथील सिडको कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी सागर मदनलालजी तापडिया या सहाय्यक वसाहत अधिकाऱ्याने तक्रारदार व्यक्तीकडे घर नावावर करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती.  तापडिया याने खासगी एजंटच्या मदतीने तक्रारदाराकडे पैसे मागितल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना  तपासात आढळून आले. त्यानुसार सापळा रचून तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताना खासगी एजंट रविंद्र छाजेड याला रंगेहाथ पकडण्यात आले. तर खासगी एजंटला लाच स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल सिडकोचे सहाय्यक वसाहत अधिकारी सागर मदनलालजी तापडिया यालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास वा सरकारी कर्मचारी लाच मागत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्वरीत तक्रार करा. यासाठी ०२२-२०८१३५९८, २०८१३५९९ या क्रमांकांवर संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

==================================================

इतर बातम्यांचाही मागोवा