आंबेत पुलाच्या दुरूस्तीदरम्यान प्रवासी बोटिची सुविधा

माणगाव तालुक्यातील आंबेत पुल तीन महिने पूर्णत: बंद राहणार

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबईः 14 जानेवारी 2020: रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणा-या माणगाव तालुक्‍यातील आंबेत पुलाच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. पुलाच्या दुरूस्ती कामामधील बेअरिंग बदलण्याचे काम करताना पूल वाहतूकीसाठी पुढील तीन महिने पूर्णत: बंद करावा लागणार आहे. यादरम्यान स्थानिकांसाठी प्रवासी बोट सेवा सुरू करण्यात यावी असे निर्देश उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

आंबेत पुलाच्या दुरूस्तीसंदर्भात आणि पर्यायी व्यवस्थेसंदर्भात कामाच्या आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी तटकरे बोलत होत्या.

पुलाची दुरावस्था पाहता हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. स्थानिक व नागरिकांसाठी कार, जीप, रिक्षा अशा हलक्या वाहनाची वाहतूक सुरू आहे. पुलाच्या दुरूस्ती कामामधील बेअरिंग बदलण्याचे काम करताना पूल वाहतूकीसाठी पुढील तीन महिने पूर्णत: बंद करावा लागणार आहे. तत्पूर्वी शालेय विद्यार्थी आणि स्थानिकांसाठी पर्यायी व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले. यासाठी मे 2020 पर्यंत पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलासंदर्भातील सर्वच कामे पूर्ण करावी, दरम्यान पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी बोट सुरू करण्यात येणार आहे.

विद्यार्थी आणि स्थानिकांना दळणवळणाच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आंबेत पुलाच्या दुरूस्तीच्या कामाचा वेग वाढवून काम पूर्ण करावे. तसेच, नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवासी बोट सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले. तसेच, नवीन पुल बांधकामाच्या मान्यतेसाठी प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या बैठकीला, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामस्वामी एन., डॉ.म.न.डेकारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बिरान बहिर, उपअभियंता पी. एस.राऊत आदिंसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थी आणि स्थानिकांसाठी पर्यायी सुरक्षित व्यवस्था असावी यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड प्रवासी बोटीची व्यवस्था करून देणार आहे. तसेच जेट्टीचीही दुरूस्ती करून देणार आहे. नवीन पूल बांधकामासाठी पीडब्लूडी निधी उपलब्ध करून देणार आहे.

डॉ. रामस्वामी एन.

मुख्य कार्यकारी अधिकारी

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड

——————————————————————————————————