नवी मुंबईत सिडको कोविड सेंटर व्यतिरिक्त इतर 17 सेंटर बंद

कोरोना वॉर रूमही बंद होणार, नागरी आरोग्य केंद्रामार्फत होणार कोरोना रुग्णसंपर्काचे काम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7 फेब्रुवारी  2022:

कोरोनाच्या तिस-या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर नवी  मुंबईतही कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोना बाधितांची दैनंदिन रूग्णसंख्या एक आकडी येत आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेली 17 कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आगामी काळात कोविड ची लाट उद्भवल्यास खबरदारी म्हणून सर्व सोयींनी सुसज्ज असलेले सिडको कोविड सेंटर रू ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे.  कोविड बाधितांच्या आरोग्य स्थितीची दैनंदिन विचारपूस, रूग्णांसाठी खाटा उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्ध होण्याकरिता मदतकार्य करणारी वॉर रुम कोरोना बंद करून कोरोना रुग्णसंपर्काचे काम संबंधीत नागरी आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येणार आहे.

सध्या कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत असून दैनंदिन कोरोना बाधितांची संख्याही कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोविड उपचारार्थ सुरु करण्यात आलेल्या सुविधांबाबत निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विशेष बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, परिवहन व्यवस्थापक तथा नोडल अधिकारी योगेश कडुस्कर, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी निलेश नलावडे उपस्थित होते.

तिस-या लाटेची सज्जता करतानाही महानगरपालिका व खाजगी अशाप्रकारे एकूण 12 हजार बेड्सची उपलब्धता करून ठेवण्यात आली. यामध्ये विशेष म्हणजे दुस-या लाटेत जाणवलेली आयसीयू व व्हेन्टीलेटर्स सुविधेची कमतरता लक्षात घेता ती दूर करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात आली. ही वाढ करतानाही नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आयसीयू सुविधा निर्माण करून या रुग्णालयांचा कोविड नंतरच्या काळातही पूर्ण क्षमतेने वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले व महानगरपालिकेची आरोग्य सेवा सक्षम करण्यात आली. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविडचा प्रभाव रोखण्यात महानगरपालिकेस यश लाभले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरी जीवन सुरळीत व्हावे यादृष्टीने अनेक सुविधा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आल्या आहेत असे समाधानकारक चित्र असले तरी कोविडचा धोका पूर्णपणे टळलेला नाही याची गांभिर्याने दखल घेऊन दैनंदिन टेस्टींगचे प्रमाण 5 हजारापेक्षा कमी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी आरोग्य विभागास दिले.

 

समाज मंदिरे  पुन्हा सर्वसमान्यांसाठी खुली होणार

कोविड काळात निर्माण करण्यात आलेल्या उपचार सुविधांची कोविड सेंटर ही महानगरपालिकेची समाज मंदिरे, सांस्कृतिक भवने अशा वास्तूंमध्ये निर्माण करण्यात आली होती. सदर वास्तू मध्ये नागरिकांना पुर्ववत कार्यक्रम  करता यावेत यादृष्टीने तेथील आरोग्य उपकरणे व सुविधा काढून घ्याव्यात असेही निर्देशित करण्यात आले.

लसीकरणालाही गती

उपचारांच्या उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याप्रमाणेच 111 इतकी मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रे सुरु करून कोव्हीड लसीकरणाचे प्रमाणही सर्वोत्तम राखण्याकडे काटेकोर लक्ष देण्यात आले. त्यामुळे 18 वर्षावरील नागरिकांचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका ठरली. त्याचप्रमाणे 15 ते 18 वयोगटातील मुलांचाही पहिला डोस 100 टक्के पूर्ण करणारी पहिली महानगरपालिका नवी मुंबईच ठरली व आता 18 वर्षावरील  99.11 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून 100 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण कऱणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका लवकरच ठरेल.

मास्कचा वापर अनिवार्य

कोविड अजून पूर्णत: संपलेला नाही याची दखल घेऊन जोपर्यंत शासन निर्देश येत नाहीत तोपर्यंत कोविडच्या विषाणूपासून दूर राहण्यासाठी मास्कचा वापर नियमित करणे अनिवार्य आहे तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणेही स्वत: च्या व इतरांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.
——————————————————————————————————