नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी स्थानिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करा

काँग्रेस नेते रविंद्र सावंत यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 22 मार्च 2021:

नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यातच आता महापालिकेच्या आस्थापनेवरील अतिरिक्त आयुक्त संवर्गातील दोन पदापैंकी एक पद महापालिका उपआयुक्त संवर्गातून पदोन्न्नतीने/ तदर्थ नेमणूक देवून त्वरीत भरण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस इंटकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सावंत यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे.

सावंत यांच्या मागणीमुळे महापालिकेतील स्थानिक अधिकारी विरुद्ध प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी असा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

एक अधिकारी प्रतिनियुक्तीचा असताना दुसरा अतिरिक्त आयुक्त महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांमधून व्हावा अशी मागणी सावंत यांनी केली असून प्रशासनाने या मागणीकडे दूर्लक्ष केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

राज्य सरकारने महापालिकेला दोन अतिरीक्त आयुक्त पदांना मंजूरी दिली आहे. यातील एक अतिरीक्त आयुक्त पदावर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. उर्वरीत अतिरीक्त आयुक्त पदावर महापालिकेच्या संवर्गातून नियुक्ती करण्यास नगरविकास विभागाने मंजूरी दिली आहे. असे असतानाही मागील काही वर्षांपासून दोन्ही जागांवर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती होत असल्याने पालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.

सावंत यांनी पुढे म्हटले आहे की, नगरविकास विभागाकडील 19 ऑक्‍टोबर 2020 चा निर्णयानुसार महापालिका आस्थापनेवर मंजूर पदांच्या अतिरिक्त आयुक्त 50 टक्के, उप आयुक्त संवर्गातील 50 टक्के, सहा. आयुक्त संवर्गातील 50 टक्के पदे, मुख्याधिकारी सवंर्गातून प्रतिनियुक्तीने भरण्याची तरतूद आहे. या व्यतिरिक्त अन्य पदे प्रतिनियुक्तीने भरता येणार नाही. असे असताना व महापालिका कर्मचाऱ्यांना 20 ते 25 वर्षांचा अनुभव असताना आजही सरकारकडून मंजूरी नसलेल्या संवर्गातून अतिरिक्त आयुक्त, उप आयुक्तांपासून उपलेखापाल पर्यंत अधिकारी कर्मचारी प्रतिनियुक्तीने येवून येथील कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पदोन्नतीच्या जागा अडवत आहे. यातच भर म्हणून महापालिका परिवहन उपक्रमातील अधिकारी कर्मचारी यांनी महापालिका आस्थापनेकडील अग्निशमन विभागप्रमुखांपासून, वाहनचालक पर्यंतची पदे प्रतिनियुक्तीने भरलेली आहेत.

  • दादासाहेब चाबुकस्वार, अमरिष पटनिगिरी यांच्या नावाची चर्चा

अतिरीक्त आयुक्त पदासाठी महापालिकेतून उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार आणि अमरिष पटनिगिरी हे दोन अधिकारी पात्र ठरले असल्याचे सावंत यांनी सांगितले. पटनिगिरी यांची उपायुक्त पदावर 15 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. रुग्णालयीन प्रशासकीय सेवा, आस्थापना व सामान्य प्रशासन, परिवहन उपक्रम, अतिक्रमण, विभागिय कामकाज, अभिलेख कक्ष, लेखा परिक्षण, सचिव विभाग, निवडणूक विभाग, शिक्षण विभाग,स्थानिक संस्था कर, परवाना विभाग, काही काळ मंत्रालयात नगरविकास विभागात काम करणारे एकमेव अधिकारी आहेत. तसेच  त्यांनी विविध विभागात काम केले आहे. या दोघांपैकी एकाला अतिरीक्‍त आयुक्त पद मिळावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा इंटकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र सावंत यांनी दिला आहे.

=================================================

  • इतर बातम्यांवरही दृष्टिक्षेप