रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे लोकार्पण

उर्वरीत घरांसाठी 7 कोटींचा निधी देणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 2 जूलै 2021:

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळुण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धी विनायक न्यासाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या 24  घरांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या 7 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव व आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी हे धरण फुटून अनेक घरे वाहून गेली होती. या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला होता.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देतांना आजुबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. निसर्गाची ताकत मोठी आहे. निसर्ग लहरी होत आहे. अनियंत्रित, अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन राज्यभरात अशाप्रकारे घटना घडू नयेत यासाठी  सावधगिरी बाळगण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. वित्तहानी भरून काढता येते परंतु मनुष्य हानी ही न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे हे आपले पहिले प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी तिवरे धरणग्रस्तांचे पुनर्वसन करतांना उर्वरित घरांच्या बांधकामासाठी 7 कोटी रुपये लागणार असून हा निधी लवकरात लवकर मिळाल्यास उर्वरित बाधित कुटुंबांनाही हक्काचा निवारा लवकर मिळू शकेल अशी मागणी केली.

कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर उपस्थित काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी तिवरे दुर्घटना,  नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी करण्यात आलेले सामुहिक व प्रशासकीय पातळीवरचे प्रयत्न आणि इतर बाबींचा आढावा घेतला.  या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्राचे मिळून प्रत्येकी 6 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आल्याची, पशुधनाच्या हानीपोटी 3 लाख रुपयांच्या रकमेचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

—————————————————————————————————————————————-