अतिक्रमण कारवाईनंतरही बांधकाम केल्यास महापालिका गुन्हा दाखल करणार

अतिक्रमण विभागाच्या आढावा बैठकीत आयुक्तांचे निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 8 सप्टेंबर 2021:

नवी मुंबई महापालिकेने एकदा नोटीस देऊन अतिक्रमण बांधकाम तोडल्यावर एफआयआर दाखल होऊनही जर पुन्हा त्याच ठिकाणी बांधकाम केले जात असेल तर ते गंभीरतेने घेऊन आयपीसी कलमाव्दारे गुन्हा दाखल करावा असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज अतिक्रमण विभागाच्या आढावा बैठकीत दिले. एकदा कारवाई करूनही दुस-यांदा नियमांचा भंग केल्याचा आढळल्यास अशा बांधकाम धारकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात यावी व ती पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात यावी असंही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

नोटीसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बांधकाम तोडतानाची कारवाई करतानाचे छायाचित्रण करून संगणक विभागाच्या सहकार्याने एक वेब ॲप्लिकेशन तयार करण्यात यावे व आढावा बैठकीप्रसंगी या कारवाईचे सादरीकरण करण्यात यावे असंही आयुक्तांनी यावेळी सांगितले.

या बैठकील अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त अमरिश पटनिगिरे तसेच सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व अतिक्रमण विभागाचे सर्व विभागातील अभियंते उपस्थित होते.

अनधिकृत बांधकामामुळे  नागरी सुविधांवरही ताण पडतो. त्यामुळे तक्रार आल्यानंतर कारवाई करण्याची वाट न पाहता आपल्या विभागामध्ये स्वत:हून अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त बांगर यांनी अतिक्रमण विभागाला दिले.

विभाग अधिका-यांवर जबाबदारी

अनधिकृत इमारतीची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी अशा इमारतींसमोर प्रसिध्द करण्यात आलेले फलक काढून टाकले जातात ही बाब गंभीरपणे घेण्यासारखी असून याबाबत ठोस कारवाई करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. विभाग कार्यालयात अतिक्रमण विभागासाठी नियुक्त अभियंते संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असून आपापल्या विभागातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे यांची संपूर्ण जबाबदारी विभाग अधिकारी यांची आहे असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

फेरीवाल्यांविरोधातील कारवाया अधिक तीव्र

फेरीवाल्यांचा उपद्रव नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. हे नवी मुंबई सारख्या शहराला साजेसे नसून रहदारीला व वाहतुकीला अडथळा पोहचविणा-या फेरीवाल्यांविरोधातील कारवाया अधिक तीव्र स्वरुपात राबवाव्यात असेही आयुक्तांनी या बैठकीत सांगितले.

——————————————————————————————————